विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांना सामोरे जावे

जयप्रकाश परब यांचे प्रतिपादन

कणकवलीत शिष्यवृत्ती सराव परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव

कणकवली : प.पू.भालचंद्र महाराज संस्थानाच्या शैक्षणिक मंडळाचा शिष्यवृत्ती सराव परीक्षेचा उपक्रम स्तुत्य असून या सराव परीक्षेत यश संपादन केलेले विद्यार्थी शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत टॉपर असतात, ही बाब शैक्षणिक मंडळासाठी अभिमानास्पद आहे. सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांना सामोरे जावून उच्च अधिकारी बनले पाहिजेत अशी अपेक्षा वैभववाडीचे गटविकास अधिकारी जयप्रकाश परब यांनी
व्यक्त केली. प. पू. भालचंद्र महाराज संस्थानाच्या शैक्षणिक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती सराव परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संस्थानाच्या सभागृहात आयोजित केला होता. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी
व्यासपीठावर प. पू. भालचंद्र महाराज संस्थानाचे अध्यक्ष सुरेश कामत, विश्वस्त प्रसाद अंधारी, निवृत्ती धडाम, सी.ए.सुहास पालव, प्रा.दिवाकर मुरकर,व्यवस्थापक विजय केळुसकर, प. पू. भालचंद्र महाराज संस्थानाच्या शैक्षणिक मंडळाचे अध्यक्ष गजानन उपरकर, केंद्रप्रमुख शुभांगी दळवी, शिक्षक प्रकाश परब, शरद हिंदळेकर,काशिनाथ कसालकर, रावजी परब, मंगेश तेली,विष्णू सुतार, श्रीकृष्ण कांबळी, सुहास आरोलकर, सदानंद गावकर, किरण
कोरगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री.परब म्हणाले, सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आहे. मात्र, हे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांना सामोरे जात नाहीत. या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्यासाठी पालकांनी प्रोत्साहन दिले पाहिजे. पालकांनी आपल्या पाल्यांवर अपेक्षांचे
ओझे न लादता त्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्याची मुभा देऊन त्यांचे बालपण हिरावून घेऊ नये, असे त्यांनी सांगितले.
यावेळी सुरेश कामत, सुहास पालव, दिवाकर मुरकर, यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांमधून मनश्री पिळणकर, आदित्य प्रभूगावकर, ध्रुव तेंडुलकर,
नवनीत परब यांनी मनोगत व्यक्त केले. तर पालकांमधून विठ्ठल मालंडकर व श्रीमती टोपले यांनी मनोगत व्यक्त करत प. पू. भालचंद्र महाराज संस्थानाच्या
शैक्षणिक मंडळाच्या शिष्यवृती सराव परीक्षेच्या उपक्रमाचे कौतूक केले.
आरंभी सरस्वती देवीचा व प. पू. भालचंद्र महाराज यांच्या पुतळ्याला मान्यवरांनी पुष्पहार
अर्पण करून या सोहळ्याचा शुभारंभ केला. मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक गजानन उपरकर यांनी केले. त्यानंतर सराव परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. शिष्यवृत्ती सराव परीक्षा यशस्वी
होण्यासाठी ज्या शिक्षकांनी मेहनत घेतली होती. त्यांचा मंडळातर्फे सन्मान करण्यात
आला. सूत्रसंचालन सदानंद गावकर यांनी केले. आभार सुहास आरोलकर यांनी
मानले. या सोहळ्याला विद्यार्थी व पालकांसह मंडळाचे सदस्य उपस्थित होते.दरम्यान कणकवली कॉलेजचे सेवानिवृत्त प्रा. दिवाकर मुरकर यांचा सत्कार करण्यात आला.
दिव्यांग सोहम साळगावकर याचा विशेष सन्मान
प. पू. भालचंद्र महाराज संस्थानाच्या शैक्षणिक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या
सावंतवाडीत केंद्रावर सोहम साळगावकर या दिव्यांग विद्यार्थ्यांने परीक्षा दिली होती.
यात तो उत्तीर्ण देखील झाला. या गुणगौरव सोहळ्यात सोहमचा जयप्रकाश परब यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी सोहम ‘कानडा राजा पंढरीचा’ हे गाणे गाऊन उपस्थितांची वाहवा मिळवली.यावेळी उपस्थित मान्यवरांना व पालकांचे डोळे पाणावले.याप्रसंगी त्याचे आई-वडील उपस्थित होते.

कणकवली / कोकण नाऊ / प्रतिनिधी

error: Content is protected !!