रिल्स मालवणीच्या ‘मालवणी अवॉर्ड्स’ सोहळ्याची रुपरेषा जाहीर

चंदू शिरसाट यांना यंदाचा कला सिंधू सन्मान पुरस्कार घोषित 

४ एप्रिलला कुडाळात विविध मालवणी पुरस्कार वितरण

मालवणी रिल्सची स्पर्धा सुद्धा जाहीर

निलेश जोशी । कुडाळ : मालवणी नटसम्राट कै. मच्छिन्द्र कांबळी यांचा ४ एप्रिल हा जन्मदिवस. मालवणी भाषा दिन म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो. या दिवसाचे औचित्य साधून येत्या ४ एप्रिल रोजी कुडाळच्या रिल्स मालवणी ग्रुपच्या वतीने मालवणी अवॉर्ड्स सोहळा रंगणार आहे. यंदाचे हे या पुरस्काराचे दुसरे वर्ष असून यंदापासून पहिल्यांदाच कला सिंधू पुरस्कार देण्यात येणार आहे. यंदाचा हा पुरस्कार ज्येष्ठ रंगकर्मी चंदू शिरसाट याना जाहीर झाला आहे. याशिवाय इतर १५ कॅटेगिरीमध्ये मालवणी अवॉर्ड दिली जाणार आहे. त्याची सुद्धा घोषणा आज झालेल्या पत्रकार परिषदेत रिल्स मालवणीचे अध्यक्ष तुषार तळकटकर, कियेटीव्ह हेड तेजस मसके, सदस्य निलेश गुरव, रुचिता शिर्के यांनी केली. 
मालवणी नटसम्राट आणि वस्त्रहरणकार मच्छिन्द्र कांबळी उर्फ बाबूजी यांची ४ एप्रिल रोजी जयंती. तो दिवस समस्त मालवणी मुलुखात मालवणी दिवस म्हणून साजरा केला जातो. त्याचेच औचित्य साधून रिल्स मालवणी या ग्रुपच्या वतीने गेल्या वर्षीपासून मालवणी अवॉर्ड्स सोहळा आयोजित करण्यात येतो. यंदा या पूरसाकर वितरण सोहळयाचे दुसरे वर्ष आहे. यंदा सुद्धा ४ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता कुडाळच्या मराठा समाज हॉल मध्ये हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती निलेश गुरव यांनी दिली. 
चंदू शिरसाट याना कला सिंधू पुरस्कार
     विविध क्षेत्रातील मालवणी अवॉर्ड्स सोबतच यंदा पासून रिल्स मालवणी तर्फे कला क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या ज्येष्ठ  कलाकारासाठी कला सिंधू पुरस्कार देण्यात येणार आहे. यंदाचा हा पहिला पुरस्कार ज्येष्ठ रंगकर्मी चंदू शिरसाट याना घोषित करण्यात आल्याची माहिती रिल्स मालवणीचे कियेटीव्ह हेड तेजस मसके यांनी दिली. रोख रुपये ११ हजार, मानपत्र  शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
 विविध १५ मालवणी पुरस्कार 
त्याच बरोबर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पंधरा जणांना देखील मालवणी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये सर्वोत्कृष्ट मालवणी प्रभावक (influencer) पुरुष, सर्वोत्कृष्ट मालवणी प्रभावक (influencer) स्त्री, सर्वोत्कृष्ट मालवणी बालकलाकार, सर्वोत्कृष्ट मालवणी फॅमेली, सर्वोत्कृष्ट मालवणी नाटक, सर्वोत्कृष्ट मालवणी वेब सेरीज, सर्वोत्कृष्ट मालवणी संस्कृती अभ्यासक, सर्वोत्कृष्ट मालवणी मालिका, सर्वोत्कृष्ट मालवणी अभिनेता, सर्वोत्कृष्ट मालवणी अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट मालवणी पत्रकार (प्रिंट मीडिया), सर्वोत्कृष्ट मालवणी दशावतार, सर्वोत्कृष्ट मालवणी गीत, सर्वोत्कृष्ट मालवणी दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट मालवणी रील या प्रकारांचा समावेश आहे.
 मालवणी रिल्स स्पर्धा जाहीर 
या निमित्ताने रिल्स मालवणी यांच्या तर्फे ‘माझी भाषा मालवणी भाषा, या विषयवार रिल्स बनवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. हे रिल्स ९० सेकंदांचे असणे आवश्यक आहे. जे रील सर्वोत्कृष्ट ठरेल ते रिल्स मालवणी च्या पेज सोबत जोडले जाईल आणि त्या विजेत्याला ४ एप्रिल दिवशी सन्मानित केले जाणार आहे. त्या रिल्स स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी ९८३४४५५१७२ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन रुचिता शिर्के यांनी केले आहे.
 मालवणी दिनादिवशी सुट्टी जाहीर करावी !
मालवणी नटसम्राट मच्छिन्द्र कांबळी यांनी मालवणी भाषा सातासमुद्रापार नेली. त्यामुळे त्यांचा जन्मदिवस मालवणी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस मालवणी भाषिकांसाठी एक उत्सव ठरावा. शासनाने देखील याची दखल घेऊन त्या दिवशी सुट्टी जाहीर करावी. किंवा शासकीय पातळीवर हा दिवस साजरा करावा अशी विनंती या निमित्ताने रिल्स मालवणी यांच्या वतीने तेजस मसके यांनी संबंधितांना केली आहे. 
या पत्रकार परिषदेला तुषार तळकटकर, निलेश गुरव, तेजस मसके, रुचिता शिर्के, चांदणी कांबळी, सचिन कोंडसकर, रामचंद्र आईर, हर्षवर्धन जोशी, विठ्ठल तळवलकर, किशोर नाईक, ओंकार मसके उपस्थित होते.

निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!