कोकणातील भाजपच्या पराजयात आम आदमी पक्षाचा मोठा हात असेल

पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष अजित फटके पाटील यांनी व्यक्त केला विश्वास
अरविंद केजरीवालना अटक केलात मात्र त्यांचे विचार बंदिस्त करता येणार नाही
अरविंद केजरीवाल यांना भाजप प्रस्तुत सरकारच्या दबावाखाली ईडीने अटक केली असेल तरी त्यांच्या विचारांना कदापिही बंदिस्त करता येणार नाही. त्यांचे विचार पुढे घेऊन जात असताना कोकणात आगामी निवडणुकीत भाजपच्या पराजयात आम आदमी पक्षाचा मोठा हात असेल असे मत आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष अजित फाटके पाटील यांनी व्यक्त केले. कणकवली येथे सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर, प्रदेश संघटन सचिव डॉ. रियाज पठाण, खोपोली शहर अध्यक्ष गॅसुद्दीन खान, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकारी आदित्य बटावले, मिली मिश्रा, शरद खरात, संदेश सावंत, प्रमोद जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना अजित फाटके पाटील पुढे म्हणालेत, देशात राजकीय परिवर्तन घडवण्याचे काम आम आदमी पक्षाने केले. पक्षाचे राष्ट्रीय संयोजक दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत राजकीय परिवर्तन घडवतानाच विकासाची नवी परिभाषा निर्माण केली त्याचा धसका देशातील सत्ताधारी भाजपाने घेतला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत केजरीवाल यांचा निवडणुकीच्या मैदानातील आवाज बंद करण्यासाठी त्यांच्यावर खोटी केस दाखल करून ईडीने अटक केली आहे. या अटक सत्राने आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते अजिबात बीतरणार नाहीत उलट नव्या जोमाने कामाला लागतील असे ते यावेळी म्हणाले. कोकणात आम आदमी पक्ष पाय रोवत असताना येथील सर्वांगीण विकासाचा नवा आराखडा पक्षाच्या माध्यमातून तयार केला जाईल असे त्यांनी यावेळी सांगितले. कोकणचे पर्यटन असेल किंवा येथील आंबा काजू बागायती क्षेत्रातील प्रश्न असतील किंबहुना कोकणातील बेरोजगारांच्या प्रश्नाबाबत देखील विचार करत असताना शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या पातळीवर कोकणचा सर्वांगीण विकास कसा करता येईल याचा आराखडा आम आदमी पक्षाच्या माध्यमातून येत्या काळात लोकांसमोर ठेवला जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
लोकसभा निवडणूक ही इंडिया आघाडीच्या नेतृत्वाखाली लढवली जात असताना इंडिया आघाडीतील घटक पक्षाच्या उमेदवाराच्या पाठीशी महाराष्ट्रात आम आदमी पक्ष सक्षमपणे उभा राहणार आहे मात्र पक्षाच्या त्रिसूत्री विकासाच्या धोरणाबाबत संबंधित उमेदवार कितपत विचार करतो याकडे देखील पक्ष नेतृत्वाचे लक्ष असेल असे सांगायला देखील ते यावेळी विसरले नाहीत. तसेच महाराष्ट्रात आम आदमी पक्षाने उमेदवार दिला नसला तरी इंडिया आघाडीतील घटक पक्षाच्या उमेदवारांनी आमच्या कार्यकर्त्यांचा सन्मान अवश्य राखला पाहिजे असेही ते यावेळी म्हणाले.
यावेळी पक्षाचे प्रदेश संघटन सचिव डॉ रियाज पठाण यांनी आम आदमी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांनी या पुढील काळात जिल्ह्यातील पक्षाची वाटचाल कशी असेल आणि येथील कोणकोणत्या मुद्द्यावर प्रामुख्याने लक्ष केंद्रित केले जाईल याबाबतचा दृष्टिकोन व्यक्त केला.
यावेळी इंडिया आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष सुशांत नाईक यांनी या आढावा बैठकीत उपस्थित रहात आम आदमी पक्षाच्या जिल्ह्यातील वाटचालीला शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी युवा सेनेचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. याप्रसंगी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा निषेधही करण्यात आला. वागदे येथील गोपरी आश्रम सभागृहात ही बैठक पार पडली.
कणकवली, प्रतिनिधी





