पिंगुळी पाझर तलाव प्रकरणी तहसीलदार कार्यालयच जबाबदार !

माजी खासदार विनायक राऊत यांचा गंभीर आरोप
दुष्काळी परिस्थितीत तलावातील पाणी उपशावर कारवाई का नाही ?
पिंगुळी पाझर तलावाच्या परिसरातील बांधकामाला पूर्णपणे तहसीलदार कार्यालय जबाबदार आहे, असा गंभीर आरोप माजी खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. राऊत यांनी यांनी पिंगुळी पाझर तलाव बचावासाठी सुरु असलेल्या गंगाराम सडवेलकर आणि तुळशीदास पिंगुळकर यांच्या उपोषणस्थळी आज तिसऱ्या दिवशी भेट दिली. सध्या जिल्ह्यात दुष्काळग्रस्त परिस्थिती उदभवलेली असताना तलावातून तीन तीन पंपाद्वारे पाणी उपसा केले जाते. आवरत बोअरवेल आढळते तरी देखील यावर तहसीलदार म्हणून तुम्ही का कारवाई केली नाही ? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. यावर कुडाळचे तहसीलदार समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. विनायक राऊत यांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याशी दोनवेळा मोबाईलवर संपर्क साधून लोकांच्या पाणीप्रश्नाशी संबंधित या प्रश्नांकडे गांभीर्याने पहा अशी त्यांना विनंती केली.
माजी खासदार विनायक राऊत यांनी आज पिंगुळी पाझर तालावप्रश्नी सुरु असलेल्या बेमुदत उपोषणाला बुधवारी तिसऱ्या दिवशी भेट दिली. त्यांनी उपोषणकर्ते जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर यांच्यासह इतर ग्रामस्थांशी चर्चा केली. नेमका विषय जाणून घेतला. त्याचवेळी गंगाराम सडवेलकर आणि तुळशीदास पिंगुळकर यांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी वैद्यकीय पथक सुद्धा येऊन गेले.
राऊत यांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याशी मोबाईल वरून संपर्क साधून पाण्याच्या या गंभीर विषयात लोकांच्या पाठीशी राहण्याचे आवाहन केले. त्यांनतर उपोषणस्थळी आलेले प्रभारी प्रांत तथा तहसीलदार सचिन पाटील यांच्याशी चर्चा केली. झालेल्या चर्चेत या सर्व विषयाला तहसील कार्यालयांतूनच आवश्यक परवानग्या दिल्या गेल्याची बाब पुढे आल्याने यासर्व प्रकाराला तहसीलदार कार्यालय जबाबदार असल्याचा आरोप विनायक राऊत यांनी केला. जिल्हा परिषदेच्या लघु पाट बंधारे विभागाला तलावातील विहिरीत पाण्याचे तीन पंप आढळले. ते जप्त केले का अशी विचारणा राऊत यांनी तहसीलदारांना केली त्यावर तहसीलदार यांनी ते काम लघु पाटबंधारे विभागाचे असल्याचे सांगितले. तेव्हा सध्या जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. पाणी जपून वापरण्याचे शासनाचे आदेश असताना, खासगी बांधकामासाठी तलावाचे पाणी वापरले गेले तर त्यावर कारवाई ल.पा. विभाग करणार कि महसूल विभाग करणार ? मग तुम्ही कारवाई का केली नाही असा सवाल राऊत यांनी विचारल्यावर तहसीलदार निरुत्तर झाले. यावेळी ग्रामस्थांनी तहसीलदार याबाबत कोर्ट केस चालू आहे असे सांगून विषय भरकटवत आहेत असा आरोप केला. ती केस प्रायव्हेट असताना तहसीलदार यांनी तसे करू नये असे राऊत यांनी सांगितले.
पर्यावरण प्रेमी मिलिंद गावडे यांनी हा तलाव १९७२ ला त्यावेळी दुष्काळी परिस्थिती होती तेव्हा बांधला गेल्याचे सांगून आताही तीच परिस्थिती आहे याकडे लक्ष वेधले. हा तलाव वेटलँडच्या नकाशावर आहे असे गावडे यांनी सांगितले तरी तहसीलदार यांनी त्याचा इन्कार केला. तहसीलदार वेटलँड कमिटीचे सदस्य असतात याची आठवण देखील त्यांनी तहसीलदारांना करून दिली. याबाबत एसआयटी कमिटी नेमून तपास करावा अशी देखील मागणी केल्याचे गावडे यांनी सांगितले.
ग्रामस्थांना तलावाकडे जाण्यास प्रतिबंध केला जात आहे. तिथे जाणाऱ्यांचे व्हिडीओ चित्रीकरण केले जाते, बाउन्सरचा वापर केला जातो, असे आरोप ग्रामस्थांनी केले. त्यावर राऊत यांनी तहसीलदारांना विचारले असता, आम्ही संबंधितांना सूचना दिल्या आहेत ते उत्तर दिले. त्यावर सूचना कसल्या देता, कारवाई करा असे राऊत यांनी सांगितले. तसेच या संपूर्ण प्रकाराबद्दल एसपी ऑफिसला पत्र लिहा आणि गावातील लोकांची सुरक्षितता अबाधित ठेवा अशा सूचना राऊत यांनी दिल्या. यावेळी त्यांनी पुन्हा जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधला.
यावेळी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधताना राऊत यांनी पिंगुळीतील पाझर तलावावर संपूर्ण गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अवलंबून असल्याचे सांगितले. तलाव परिसरातील कथित अतिक्रमण आणि विकासकामांमधील सांडपाणी तलावात मिसळण्याची शक्यता यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. जमिनींच्या व्यवहारांत शासकीय यंत्रणेचा गैरवापर झाल्याचा आरोप करत या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.पिंगुळी ग्रामस्थांचा लढा हा केवळ तलावापुरता मर्यादित नसून गावाच्या पिण्याच्या पाण्याच्या हक्काचा आणि नैसर्गिक जलस्रोतांच्या संरक्षणाचा प्रश्न आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे पक्ष ग्रामस्थांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, अशी ग्वाही राऊत यांनी दिली.
यावेळी उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, युवासेना अध्यक्ष मंदार शिरसाट, तालुकाप्रमुख राजन नाईक, श्रेया परब, बबन बोभाटे, बाळा पावसकर आदी उपस्थित होते.






