नेरूरमध्ये ७ नोव्हेंबरला भव्य नरकासुर स्पर्धा

रणझुंझार मित्र मंडळ व जि. प. सदस्य रूपेश पावसकर यांचे आयोजन
प्रथम क्रमांकासाठी २० हजारांचे पारितोषिक
नेरूर पंचक्रोशीतील कलाप्रेमी आणि नरकासुर मंडळांना आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे. रणझुंझार मित्र मंडळ आणि जिल्हा परिषद सदस्य रूपेश अशोक पावसकर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कलेचा देव कलेश्वर – भव्य नरकासुर स्पर्धा २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असून, शनिवार, ७ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ८ ते १० या वेळेत नेरूर चव्हाटा येथील हनुमान मंदिर परिसरात ही स्पर्धा रंगणार आहे.
या स्पर्धेत उत्कृष्ट नरकासुर प्रतिमा, आकर्षक वेशभूषा, नावीन्यपूर्ण संकल्पना आणि प्रभावी सादरीकरण करणाऱ्या मंडळांना रोख पारितोषिके व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. प्रथम क्रमांकासाठी २० हजार रुपये व चषक, द्वितीय क्रमांकासाठी १५ हजार रुपये व चषक, तर तृतीय क्रमांकासाठी १० हजार रुपये व चषक असे पारितोषिकांचे स्वरूप आहे. याशिवाय सहभागी होणाऱ्या इतर सर्व मंडळांना प्रत्येकी एक हजार रुपये उत्तेजनार्थ पारितोषिक दिले जाणार आहे.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या मंडळांनी नरकासुर प्रतिमा रात्री ८ वाजेपर्यंत स्पर्धास्थळी आणणे बंधनकारक आहे. उशिरा येणाऱ्या मंडळांचे १० गुण कमी केले जाणार आहेत. प्रत्येक संघाला सादरीकरणासाठी जास्तीत जास्त १० मिनिटांचा वेळ देण्यात येईल. सादरीकरणात नरकासुराचा वध करणे आवश्यक असून, पौराणिक कथेचा आधार घेऊन त्यात आवश्यकतेनुसार बदल करण्याची मुभा देण्यात आली आहे. ही स्पर्धा केवळ नेरूर पंचक्रोशीतील मंडळांसाठी मर्यादित राहणार आहे.
स्पर्धेचे परीक्षण नरकासुर प्रतिमा, वेशभूषा व रंगसंगती, चल चित्र, नावीन्यपूर्ण संकल्पना, सादरीकरण व नरकासुर वध, विषय व प्रश्नोत्तरे तसेच वेळेचे पालन अशा विविध निकषांवर एकूण १०० गुणांच्या आधारे केले जाणार आहे. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
या स्पर्धेत नेरूर पंचक्रोशीतील जास्तीत जास्त मंडळांनी सहभागी होऊन आपल्या कलागुणांचे प्रदर्शन करावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी कल्पेश मार्गी (८३९०६१६७६०), प्रविण नेरुरकर (९४२२९४८०२४), संतोष परब (९३७०९८३००३), अमोल शुंगारे (८६०५४६४०५६) आणि कृष्णा पाटकर (९३५६०२२३८७) यांच्याशी संपर्क साधावा.





