प्रशासनाच्या तोंडी आश्वासनाला ग्रामस्थांचा नकार; सडवेलकर यांचे उपोषण कायम

तलावाच्या मोजणीवरून दोन सरकारी विभागांत विसंवाद; ग्रामस्थ संतप्त
प्रशासन आणि आंदोलकांमध्ये उशिरापर्यंत चर्चा
‘पाझर तलाव आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा’, ‘पाझर तलावावर अतिक्रमण करणाऱ्यांचे करायचे काय, खाली डोकं वर पाय’ आणि ‘पिंगुळी ग्रामस्थ एकजुटीचा विजय असो’ अशा गगनभेदी घोषणा देत पिंगुळीतील ग्रामस्थांनी मंगळवारी कुडाळ तहसील कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला. पिंगुळी येथील पाझर तलावावरील कथित अतिक्रमणाच्या विरोधात आणि तलावाच्या संरक्षणासाठी जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर यांनी सुरू केलेले बेमुदत उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरूच राहिले. प्रशासनाकडून ठोस लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याची ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली.
दिवसभर प्रशासनाकडून कोणताही ठोस निर्णय न आल्याने सायंकाळी संतप्त ग्रामस्थांनी तहसील कार्यालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुख्य प्रवेशद्वारावर तैनात पोलिसांनी त्यांना रोखले. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रभारी प्रांताधिकारी तथा तहसीलदार सचिन पाटील स्वतः प्रवेशद्वारावर आले. यावेळी ग्रामस्थांनी त्यांच्यासमोर आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढील निर्णय कळविण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
दरम्यान, सायंकाळी उशिरा जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाचे उपअभियंता वसंत मोहिते यांनी विभागाचा अहवाल घेऊन उपोषणस्थळी हजेरी लावली. त्यांनी आंदोलकांना अहवाल वाचून दाखविला. पिंगुळी पाझर तलाव हा नैसर्गिक नसून मानव निर्मित असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. तलाव मानव निर्मित असल्याने त्यापासून २०० मीटर हवाई अंतरापर्यंत बांधकाम करता येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. विकासकाकडून याबाबतचा अहवाल मागविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
सोमवारी करण्यात आलेल्या पाहणीदरम्यान तलावातील विहिरीत तीन पाणी उपसा पंप आढळून आले, तसेच तलावापासून काही अंतरावर बोअरवेल असल्याचेही निदर्शनास आले होते. मात्र, या बाबींवर प्रशासनाकडून नेमकी कोणती कारवाई केली जाणार, याबाबत उपअभियंत्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.
त्यानंतर प्रभारी प्रांताधिकारी सचिन पाटील आणि भूमिअभिलेख विभागाचे गणेशकर यांनी आंदोलकांशी चर्चा केली. यावेळी लघुपाटबंधारे विभाग आणि भूमिअभिलेख विभाग यांच्यात तलावाच्या मोजणीवरून समन्वयाचा अभाव असल्याचे समोर आले. लघुपाटबंधारे विभागाने तलावाच्या जमीन मोजणीसाठी भूमिअभिलेख विभागाकडे चार वेळा पत्रव्यवहार केला असून त्याच्या पोचपावत्याही असल्याचे सांगण्यात आले. मात्र, एवढे पुरावे असूनही आपल्याला संबंधित पत्रे मिळाली नसल्याचे गणेशकर यांनी सांगितल्याने ग्रामस्थ अधिकच आक्रमक झाले. दोन शासकीय विभागांमध्ये समन्वय नसल्याचा फटका ग्रामस्थांना बसत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
यावेळी प्रभारी प्रांताधिकारी सचिन पाटील यांनी सांगितले की, पाझर तलावाबाबत ग्रामस्थांनी केलेल्या मागण्यांची दखल आपण प्रभारी प्रांताधिकारी म्हणून घेतली आहे. लघुपाटबंधारे विभाग आणि जिल्हा परिषदेचा प्रस्ताव बुधवारी सायंकाळी ६ वाजण्यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात येईल. हे प्रकरण अंतिम टप्प्यात असून नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वानुसार संबंधित दुसऱ्या पक्षालाही आपली बाजू मांडण्याची संधी देणे आवश्यक आहे. तलावाची मोजणी करण्यासाठी लवकरच कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही देत त्यांनी सडवेलकर यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली.
मात्र, प्रशासनाकडून केवळ तोंडी आश्वासन नको, तर ठोस निर्णयाचे लेखी पत्र मिळाल्यानंतरच उपोषण मागे घेतले जाईल, अशी भूमिका आंदोलकांनी कायम ठेवली. त्यामुळे सडवेलकर यांचे उपोषण सुरूच राहणार आहे. विशेष म्हणजे, उपोषणाच्या दुसऱ्याच दिवशी सडवेलकर यांची प्रकृती खालावली होती. त्यांनी पाणीदेखील प्राशन केले नसल्याने त्यांना त्रास जाणवत होता. रात्री वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी केली.
या आंदोलनाला सर्वपक्षीय नेत्यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला. माजी आमदार वैभव नाईक, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब, काँग्रेस तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, कुणाल किनळेकर, बाबल गवडे, दीपक गावडे, मिलिंद परब, बबन बोबाटे, दर्शन कुडव, बाबल्या दळवी, श्रेया परब, निर्मला पालकर, तुळशीदास पिंगुळकर, संजय वाळके, दीपक राऊळ, महेश धोंड, अनंत धुरी यांच्यासह पिंगुळीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन प्रशासनाने तहसील कार्यालय परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता. पोलीस अधिकाऱ्यांसह सुमारे २० पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला होता. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून कुडाळ पोलीस ठाण्यात आरसीपीचे विशेष पथकही सज्ज ठेवण्यात आले होते.






