आ. वैभव नाईक यांनी परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर्स बाबतच्या शासन निर्णयाचे फुकाचे श्रेय घेऊन नये !

शिवसेना तालुका प्रमुख राजा गावकर यांची आम. वैभव नाईकांवर जोरदार टीका

किरण सामंत, उदय सामंत यांच्या प्रयत्नातून तो शासन निर्णय

निलेश जोशी । सिंधुदुर्ग : परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर्सवर कारवाई करण्याबाबतचा शासन निर्णय सिंधुरत्न समिती सदस्य किरण सामंत आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नातून झाला आहे. त्यासाठी शिवसेना मालवण तालुका प्रमुख राजा गावकर आणि नीलक्रांती कृषी व मत्स्य पर्यटन सहकारी संस्था मालवणचे अध्यक्ष रविकिरण तोरसकर यांनी देखील दोन दिवस मंत्रालयात स्वतः हजर राहून याचा पाठपुरावा केला आहे. त्यामुळे याचे फुकटचे श्रेय घेण्याचा आमदार वैभव नाईक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेऊन नये, असा सल्ला शिवसेना मालवण तालुका प्रमुख राजा गावकर यांनी शिवसेना उबाठा गटाला दिला आहे. राजा गावकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात आमदार वैभव नाईक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर जोरदार टीका केली आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात राजा गावकर म्हणतात, महाराष्ट्र राज्याला ७२१ किमी ची सागरी किनारपट्टी लाभली आहे. किनारपट्टीवरील मच्छीमार समुदाय हा प्रामुख्याने मासेमारी करून आपला उदरनिर्वाह करत आहे. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणी सिंधुदुर्ग अशा पाच जिल्ह्यांमध्ये मत्स्य व्यवसायाचा मोठा वाटा आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रामध्ये मासेमारी चालते. त्यावर महाराष्ट्र राज्य मत्स्य व्यवसाय खात्याचे नियंत्रण आहे. परंतु गेले कित्येक वर्ष परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर्स विशेषतः कर्नाटक मल्पी येथून येणाऱ्या लोकांनी महाराष्ट्राची मत्स्यसंपदा लुटून नेली आहे. त्याचा परिणाम मत्स्य खाते तसेच मत्स्य व्यवसायावर ही झाला आहे. परप्रांतीय नौका झुंडीने येऊन सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ले करणे, स्थानिक मच्छीमारांच्या बोटी फोडणे हे नित्याचे झाले आहे. महाराष्ट्राच्या सागरी जलधी क्षेत्रामध्ये सदरच्या परप्रांतीय नौकांच्या अतिक्रमणावर कारवाई करण्यासाठी आत्ताची मत्स्य व्यवसाय खात्याकडे असलेली साधन सामग्री व मनुष्यबळ अपुरे आहे. यासाठी राज्यातील विविध मच्छीमार संघटना परप्रांतीय अनधिकृत मासेमारी करणाऱ्या नौकांवर कारवाई करण्यासाठी स्वतंत्र अंमलबजावणी कक्षाची स्थापना व्हावी ही मागणी सातत्याने करीत होते.
त्याच अनुषंगाने सिंधुरत्न समिती सदस्य तसेच भावी खासदार किरणजी सामंत तसेच उद्योग मंत्री उदयजी सामंत या बंधू जोडीने विशेष पाठपुरावा करून अवघ्या दोनच दिवसात मंत्रालयीन स्तरावर सातत्याने मागणी जोर लावून धरली. अगदी विशेष अधिवेशनामध्ये पण ही मागणी ठेवून तात्काळ याची अंमलबजावणी करून घेतली. लागलीच या स्वतंत्र अंमलबजावणी कक्षासाठी जी समिती स्थापन केली त्यासाठी मत्स्य उद्योग मंत्री सुधीरजी मुनगंटीवार यांच्याशी संपर्क साधून सदरचा शासन निर्णय तात्काळ करून घेतला. शिवसेनेचे मालवण तालुका प्रमुख राजा गावकर आणि रविकिरण तोरसकर यांनी देखील दोन दिवस मंत्रालय स्तरावर सातत्याने उदय सामंत आणि किरण सामंत या बंधुद्वयींच्या संपर्कात राहून त्यांचे सोबत पाठपुरावा करत होते…
राजा गावकर पुढे म्हणतात, त्यामुळे या शासन निर्णयाचे कुणीही फुकटचे श्रेय घेऊ नये कारण विद्यमान आमदार वैभवजी नाईक साहेब आणि त्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनाही नेहमीच फुकटचे श्रेय घेण्याची सवय झाली आहे याची प्रचिती त्यांनाही आणि जनतेलाही वारंवार आलेली आहे. त्यामुळे किमान आता तरी या सर्वांनी हे लंकेचे ढोल बडवणे थांबवावे. कारण जनतेला आता सर्व बाबी कळून चुकलेल्या आहेत. त्यामुळे जनता हे जाणते की कुणावर विश्वास ठेवावा आणि कुणावर विश्वास ठेवू नये. त्यामुळे एक फुकटचा सल्ला देऊ इच्छितो की हिम्मत असेल तर स्वतः पाठपुरावा करून एखादे काम मार्गी लावा आणि त्यानंतरच त्याचे गोडवे गावा परंतु या सर्वांना या गोष्टीची सवयच झालेली आहे की खोटे बोला पण रेटून बोला. आता हे खोटे बोलणे यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये कसे महागात पडेल हे मतदानानंतर मतमोजणीच्या दिवशीच दिसेल.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आज पर्यंत नारायणराव राणे साहेब यांनी अथक परिश्रम केले. त्याचप्रमाणे विकासाचे व्हिजन डोळ्यासमोर असलेले आमचे नेते दीपकभाई केसरकर, आमदार नितेशजी राणे, निलेशजी राणे तसेच आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण आणि उदयजी सामंत त्यानंतर भावी खासदार किरणजी सामंत साहेब हे सर्वजण कटिबद्ध आहेत….
त्यामुळे विरोधकांनी ह्या एका गोष्टीची मोट नक्कीच बांधावी की सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्याची धमक ती फक्त आणि फक्त महायुतीच्या नेत्यांमध्येच आहे आणि त्यावर फुकटचे श्रेय आणि अपप्रचार करून तोंडसुख घेण्याची धमक ही तुमच्या आघाडीच्या नेत्यांमध्ये आहे. त्यामुळे हिम्मत असेल तर इतरांनी केलेल्या विकास कामांचे फुकटचे श्रेय घेऊन त्यावरती बोलण्यापेक्षा स्वतः तुमच्या आमदार खासदारांच्या निधीतून केलेल्या विकास कामांवर बोला. दिवसेंदिवस महाराष्ट्राच्या विकासाचे व्हिजन असलेले आमचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या कामाचा चढता आलेख बघून महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे बरेचसे पदाधिकारी कार्यकर्ते नेते हे आमच्या पक्षात प्रवेश करत आहेत त्यामुळे इतरांवर बोलण्यापेक्षा स्वतःचे कार्यकर्ते आणि नेते यांना सांभाळा नाहीतर एक दिवस असा येईल की ना काम करण्यासाठी कोणी राहील ना बोलण्यासाठी कोणी राहील ना मत मागण्यासाठी कोणी राहील. असे राजा गावकर यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

निलेश जोशी, कोकण नाऊ, सिंधुदुर्ग.

error: Content is protected !!