सामाजिक बांधिलकीतून फोंडाघाट सरपंच सौ. संजना आग्रे यांचा वाढदिवस साजरा

कणकवली तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या फोंडा ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. संजना आग्रे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून आणि साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यानिमित्त फोंडाघाट ग्रामपंचायत कार्यालयात कुपोषित बालकांना पोषण आहाराचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी तसेच अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. अंगणवाडी सेविकांनी आपल्या मनोगतातून सौ. संजना आग्रे या महिला सरपंच म्हणून गावातील महिलांना विश्वासात घेऊन उत्तम व लोकाभिमुख ग्रामपंचायत कारभार राबवत असल्याचे गौरवोद्गार काढत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी एकनाथ शिंदे शिवसेनेचे उपनेते श्री. संजय आग्रे, उपसरपंच सौ. तन्वी मोदी, ग्रामविकास अधिकारी श्री. मंगेश राणे, विकास सोसायटी चेअरमन श्री. राजन नांनचे, ग्रामपंचायत सदस्य श्री. मिथिल सावंत, श्री. विठ्ठल लाड, सौ. प्राची धुरी, सौ. अवंती सावंत, श्री. अनिकेत पारकर व श्री. पवन भोगले आदी मान्यवर उपस्थित होते.
सामाजिक जाणीव जपत साजरा करण्यात आलेला हा वाढदिवस लोकांमध्ये कौतुकाचा विषय ठरला.





