कणकवली बाजारपेठेतील ओव्हरहेड विद्युत वायर अपघातास कारणीभूत ठरण्याची शक्यता

नागरिकांच्या सुरक्षिततेच्या प्रश्न देखील ऐरणीवर

तात्काळ दखल घ्या अन्यथा वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रार करणार

कणकवली शहरातील बाजारपेठ परिसरात सुरू असलेल्या ओव्हरहेड विद्युत लाईन बदलण्याच्या कामात गंभीर त्रुटी असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते राजाराम उर्फ प्रद्युम उदय मुंज यांनी केला आहे. काही ठिकाणी विद्युत पोल उपलब्ध नसल्याने ओव्हरहेड वायर अपुऱ्या आधारावर लटकलेल्या अवस्थेत असून त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबतचे निवेदन श्री. मुंज यांनी महावितरण चे शहर सहाय्यक अभियंता विकास पवार यांना दिले आहे.
बाजारपेठ हा कणकवली शहराचा अत्यंत वर्दळीचा रस्ता असल्याने या ठिकाणी अपघात होण्याची दाट शक्यता आहे. सदर ओव्हरहेड वायर ज्या ठिकाणी विद्युत पोल नाही, त्या ठिकाणी थेट बीएसएनएलच्या पोलवरून जोडण्यात आल्या असून पुढे महावितरणच्या मुख्य विद्युत पोलशी त्या जोडल्या असल्याची माहिती देण्यात आली आहे.
या संदर्भात संबंधित कंत्राटदार व सहाय्यक अभियंता यांच्या निदर्शनास बाब आणून देण्यात आली असून, ज्या ठिकाणी पोल उपलब्ध नाहीत त्या ठिकाणी नवीन विद्युत पोल उभारण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. मात्र अद्याप प्रत्यक्ष कार्यवाही न झाल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
या संपूर्ण प्रकाराबाबत महावितरण प्रशासनाने तातडीने योग्य ती कारवाई करून संभाव्य धोका टाळावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजाराम उदय मुंज यांनी केली आहे.

error: Content is protected !!