खारेपाटण येथे ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचा १९ वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न

खारेपाटण येथे ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचा १९ वा वर्धापन दीन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.
“ज्येष्ठ होणे म्हणजे वृद्धापकाळाने वाटचाल होणे असे जरी खरे असले तरी समाजातील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी वयाने जरी वृद्ध झाला असला, तरी मनाने तरुण राहणे काळाची गरज असल्याचे.” भावपूर्ण उदगार खारेपाटण सरपंच सौ. प्राची ईसवलकर यांनी ज्येष्ठ नागरिक सेवा संघ खारेपाटण च्या १९ व्या वर्धापन दिन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना काढले.
खारेपाटण,शिवाजीपेठ येथे संपन्न झालेल्या या ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या वर्धापन दीन तथा मेळावा कार्यक्रमाला खारेपाटण सरपंच सौ. प्राची ईसवलकर,सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार श्री. संतोष पाटणकर, ज्येष्ठ नागरिक सेवा संघ खारेपाटण या संघटनेचे अध्यक्ष श्री. अनंत पाटणकर खारेपाटण गट विकास सोसायटीचे संचालक श्री. सुरेंद्र कोरगावकर, सिं. जि. म. सहकारी बँक शाखा खारेपाटण चे सेवानिवृत्त शाखा अधिकारी श्री. सुरेश गोडवे, सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक श्री. कुबल गुरुजी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
प्रारंभी संघटनेच्या ज्या सभासदांचे निधन झाले. त्यांना संघटनेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष श्री. अनंत पाटणकर यांनी वयाची ९० वर्षे पूर्ण केल्याबद्दल सरपंच सौ. प्राची ईसवलकर यांच्या शुभहस्ते त्यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. तर संघटनेच्या ७५ वर्षे पूर्ण करणाऱ्या महिला व पुरुष सभासदांचा तांब्या पेला तर ८० वर्षे पूर्ण करणाऱ्या सभासदांचा सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व पुषगुच्छ देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते गौरव करण्यात आला.
खारेपाटण येथील ज्येष्ठ नागरिकांसाठी हक्काची व स्वतंत्र कार्यालयासाठी जागा खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन यावेळी सरपंच सौ. प्राची ईसवलकर यांनी ज्येष्ठ नागरिकांना मेळाव्यात दिले. यावेळी पत्रकार श्री. संतोष पाटणकर, श्री. भिडे गुरुजी, सेवानिवृत्त हवालदार श्री. खांडेकर, श्री. कुबल गुरुजी यांनी आपली मनोगते व्यक्त करून जेष्ठ नागरिक मेळाव्याला मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला खारेपाटण येथील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री. कुबल गुरुजी यांनी केले. तर सर्वांचे आभार श्री. सुरेंद्र कोरगावकर यांनी मानले.

error: Content is protected !!