प. पू. भालचंद्र महाराज संस्थानच्या जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षेचा शुभारंभ

कणकवली व सावंतवाडी केंद्रावर ८५० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
परमहंस भालचंद्र महाराज संस्थानच्या शैक्षणिक मंडळामार्फत आयोजित जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षेचा शुभारंभ रविवारी भक्तिमय व शैक्षणिक वातावरणात पार पडला. कणकवली केंद्रावर संस्थानचे अध्यक्ष सुरेश कामत तर सावंतवाडी केंद्रावर विश्वस्त प्रसाद अंधारी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या परीक्षेची सुरुवात करण्यात आली.
इंग्रजी व मराठी माध्यमातून घेण्यात आलेल्या या परीक्षेत पूर्व उच्च प्राथमिक (पाचवी) व पूर्व माध्यमिक (आठवी) स्तरावरील एकूण ८५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ही परीक्षा कणकवली एस. एम. हायस्कूल, कणकवली व सावंतवाडी हायस्कूल, सावंतवाडी अशा दोन केंद्रांवर यशस्वीपणे पार पडली.
कणकवली केंद्रावर शैक्षणिक मंडळाचे अध्यक्ष गजानन उपरकर, विश्वस्त नागेश मुसळे, व्यवस्थापक विजय केळुसकर, प्रा. दिवाकर मुरकर, एस. एम.हायस्कूलचे प्राचार्य जी. एन. बोडके, डी. एड कॉलेजचे प्राचार्य शाम सोनुर्लेकर, शरद हिंदळेकर, सदानंद गावकर, मंगेश तेली, विष्णु सुतार, निलेश पारकर, सुहास मुसळे, सुचिता गायकवाड कदम, अरुण इंगळे तर सावंतवाडी केंद्रावर विश्वस्त काशिनाथ कसालकर, सुहास आरोलकर, श्रीकृष्ण कांबळी, किरण कोरगावकर, सिद्धेश कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना अध्यक्ष सुरेश कामत म्हणाले, परमहंस भालचंद्र महाराज संस्थानच्या शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्ग व सराव परीक्षा या खऱ्या अर्थाने सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांसाठी पर्वणी ठरल्या आहेत. गेल्या ४० वर्षांपासून संस्थान सातत्याने शैक्षणिक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांसाठी सक्षम करण्याचे कार्य करत आहे. भविष्यात सिंधुदुर्गातील विद्यार्थी स्पर्धेत टिकून राहावेत, हाच या उपक्रमाचा उद्देश आहे.
ही स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी परमहंस भालचंद्र महाराज संस्थानच्या शैक्षणिक मंडळातील सदस्य तसेच कणकवली अध्यापक विद्यालय, कणकवली येथील विद्यार्थ्यांनी पर्यवेक्षक म्हणून भूमिका पार पाडली.





