जीवन अधिक सुखकर व सुसंस्कृत बनविण्यासाठी वैज्ञानिक दृष्टीच हवी – अनिसचे विजय चौकेकर यांचे वेतोरे येथे प्रतिपादन

स्वामी विवेकानंद, स्वातंत्र्यवीर सावरकर, संत गाडगेबाबा, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, बाबासाहेब आंबेडकर यांचे विज्ञानवादि दृष्टीकोणाचे विचार समाजासाठी आदर्शवत आहेत असं प्रतिपादन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक विजय चौकेकर यांनी शिक्षण प्रसारक समिती वेतोरे चे श्री देवी सातेरी हायस्कूल, व कै गुलाबताई दिनानाथ नाईक कनिष्ठ महाविद्यालय वेतोरे येथे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती व जनसेवा प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना केले.
वैज्ञानिक संशोधनाच्या आधारे अंधश्रद्धेची चिकित्सा करताना समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविणे व सामाजिक शोषणाविरुद्ध प्रबोधन करण्यासाठी त्यांनी विविध प्रयोग करून दाखवले व रहस्यमय घटना मागील सत्य विद्यार्थी यांना उलगडुन दाखविले.
यावेळी जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष व सिंधुदुर्ग जिल्हा अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे उपाध्यक्ष डॉ.संजीव लिंगवत यांनी अनिसच्या माध्यमातून आजवर शकुंतला देवी, पायलट बाबा, माॅरेस सेरेल्लो, विदेशी पाद्री, परी अम्मा, रज्जाक बाबा, रौफ बाबा यांची पितळ कशी उघडी पडली ते सांगुन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा देव व धर्म यांना विरोध नसून दैवी चमत्कार दाखवून गोरगरीब जनतेला लुटणाऱ्या व फसविणाऱ्या बुवाबाजीला विरोध आहे हे स्पष्ट केलं व जादुटोणा विरोधी कायदा २०१३ बाबतीत थोडक्यात माहिती दिली.
यावेळी व्यासपीठावर सातेरी हायस्कूल वेतोरेचे मुख्याध्यापक संजय परब, अनिस वेंगुर्ले तालुकाध्यक्ष शिवराम आरोलकर उपस्थित होते.
कार्यक्रमात मंत्राने अग्नी प्रज्वलित करणे, जळता कापूर खाणे, जीभेतून आरपार तार बाहेर काढणे, हवेतुन सोन्याची चेन काढून दाखविणे . गडयात भूत उतरविणे . मंत्राने अगरबत्तीची दिशा बदलणे . नारळातून करणी काढणे आदी प्रात्यक्षिके सादर करुन त्यामागील शास्त्रीय कारणे सांगण्यात आली व उपस्थित विद्यार्थी वर्गाच्या चर्चासत्रात शंकानिरसन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलेश पेडणेकर यांनी तर स्वागत व आभारप्रदर्शन मुख्याध्यापक संजय परब यांनी केले.
यावेळी सौ. दिप्ती प्रभू, तुकाराम भोगण, पांडुरंग वगरे, सौ.सुजाता नाईक , तानाजी चव्हाण , सौ.प्रविणा पालव , सौ.ओवी पवार, शिल्पा जोशी, श्री.प्रशांत सावंत, श्री.रविकांत कदम , कैलास खरबडे आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
वेंगुर्ले(प्रतिनिधी)