स्वच्छता ही सेवा ‘ अभियानांतर्गत सावंतवाडी तालुक्यात राबविण्यात आली श्रमदान मोहीम
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या २ ऑक्टोंबरला असणाऱ्या १५४ व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर रविवारी १ ऑक्टोबर रोजी देशभर स्वच्छता मोहिम राबवली जात आहे. देशभरात ‘स्वच्छता ही सेवा ‘ अभियानांतर्गत श्रमदान केलं जात आहे शहरात पालिका प्रशासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या महास्वच्छता अभियानाला विविध सेवाभावी संस्थांसह नागरिकांचा व शालेय विद्यार्थ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला. स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत गांधी जयंतीचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार संपूर्ण देशात हा स्वच्छता उपक्रम राबवण्यात आला. याच पार्श्वभूमीवर सावंतवाडी शहरात आयोजित करण्यात आलेल्या अभियानाला येथील गांधी चौकातून शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर शहरातील आठ प्रभागात पालिका प्रशासनाच्या सहकार्याने सहभागी स्वच्छता दूतांनी संबंधित परिसराची स्वच्छता केली. तर मोती तलावा भोवती मानवी साखळी करून स्वच्छते संदर्भात घोषणा देत या उपक्रमाची सांगता करण्यात आली.यावेळी युवराज लखमराजे सावंत-भोसले, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, मुख्याधिकारी सागर साळुंखे, माजी नगरसेवक सुधीर आडीवरेकर, आनंद नेवगी, सुरेंद्र बांदेकर, भारती मोरे, शुभांगी सुकी, दिपाली भालेकर, दिपाली सावंत, शर्वरी धारगळकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, आरोग्य विभागाचे अधिकारी पांडुरंग नाटेकर, रसिका नाडकर्णी, आसावरी शिरोडकर, देविदास आडाकर,अक्षय पंडित, युवा रक्तदाता संघटनेचे देव्या सूर्याजी, वेंगुर्ला पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक शेखर दाभोलकर आदींसह मोठ्या संख्येने राजकीय लोकप्रतिनिधी, सेवाभावी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, शहरातील नागरी आणि शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते.
सावंतवाडी, प्रतिनिधी