कोकण रेल्वे ठप्प झाल्याने चाकरमान्यांना मुंबईला जाण्यासाठी एसटीच्या तीन स्लीपर कोच गाड्या

आमदार नितेश राणे यांच्या पाठपुराव्यातून कणकवली ला आल्या होत्या तीन स्लीपर कोच
माजी नगराध्यक्ष समीर नलावडेंच्या हस्ते या तीनही एसटीचे लोकार्पण
सिंधुदुर्गातून मुंबईला जाण्यासाठी तात्काळ सहा गाड्या सोडल्या
कणकवली/दिगंबर वालावलकर
कोकण रेल्वे मार्गावर मालगाडीचे डबे घसरून कोकण रेल्वे मार्ग ठप्प झाल्यामुळे कोकणातून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर एसटीचे विभाग नियंत्रक अभिजीत पाटील यांनी सिंधुदुर्गातून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी सिंधुदुर्गातून सहा एसटी सोडण्याचा निर्णय घेतला. यात आमदार नितेश राणे यांच्या पाठपुराव्याने कणकवलीत आजच दाखल झालेल्या तीन स्लीपर कोच एसटी तात्काळ मुंबईच्या दिशेने सोडण्याचा निर्णय घेतला. कणकवली बोरवली या एसटीचे ऑनलाईन तिकीट बुकिंग करण्यात आल्याने तीनही एसटी काही वेळातच फुल झाल्या. व त्यानंतर अजून मागणी आल्याने साध्या ३ एसटी सोडण्यात आल्या. या स्लीपर कोच एसटीमध्ये 30 प्रवाशांची आसन व्यवस्था असून, आरामदायी प्रवास मिळत असल्याने प्रवाशांमधून मोठे समाधान व्यक्त करण्यात आले. या स्लीपर कोच असलेल्या एसटी च्या प्रवासी वाहतुकीचा शुभारंभ कणकवली चे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांच्यासोबत सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक अभिजीत पाटील, जिल्हा व्यापारी संघाचे सदस्य राजू गवाणकर, आगार व्यवस्थापक प्रमोद यादव, चालक एस एस राणे,
प्रसाद भोगले, व्ही. एम फोंडके
उपयंत्र अभियंता सुजित डोंगरे,
वाहतूक निरीक्षक प्रदीप परब आदि उपस्थित होते. विभाग नियंत्रकांनी घेतलेल्या या तात्काळ निर्णयाबद्दल माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी देखील समाधान व्यक्त केले. सिंधुदुर्गात सावंतवाडी मधून तीन, कुडाळ मधून एक व कणकवली मधून तीन अशा एकूण सात एसटी मुंबईतील जाण्यासाठी सोडण्यात आल्या आहेत अशी माहिती विभाग नियंत्रक अभिजीत पाटील यांनी दिली.