आडाळी शाळेत ‘ओळख रानभाज्यांची, आहार पौष्टिकतेचा ‘ उपक्रम

ओळख रानभाज्यांची, आहार पौष्टिकतेचा ‘ हा कार्यक्रम नुकताच आडाळी प्राथमिक शाळेत घेण्यात आला.
विद्यार्थ्यांना रानभाज्यांची ओळख होऊन दैनंदिन आहारात त्यांचा वापर वाढविण्यासाठी रानभाज्यांचे प्रदर्शन आयोजित केले होते. आडाळी ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम सपन्न झाला.
सरपंच पराग गांवकर यांनी ‘ ओळख रानभाज्यांची, आहार पौष्टिकतेचा ‘ संकल्पना स्पष्ट केली.
ते म्हणाले ‘ जुन्या पिढीच्या तुलनेत आजच्या विद्यार्थ्यांचा जंगलाशी पर्यायाने निसर्गाशी असलेला संपर्क कमी होत आहॆ. त्यामुळे निसर्गत: असलेल्या अनेक चांगल्या गोष्टींची ओळख देखील आपण हरवत चाललो आहोत. त्यामुळे सहज, सकस, स्वस्त आणि शुद्ध अशा भाज्यांचा आहारातील वापर वाढवायचा असेल तर मुलांना रानभाज्यांची ओळख करून द्यायला हवी. त्यासाठी हे प्रदर्शन भरवले आहॆ. हा केवळ उपक्रम न रहाता दैनंदिन जीवनाचा भाग होण्यासाठी पुढाकार घेऊया.
यावेळी पालक व ग्रामस्थांनी दहाहून अधिक रानभाज्या प्रदर्शनात मांडल्या. तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांनी आणलेल्या भाजीची माहिती दिली. उपसरपंच परेश सावंत, ग्रामपंचायत सदस्य संजना गांवकर, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष आरती गांवकर, माजी अध्यक्ष रामा मेस्त्री, निसर्गप्रेमी भिवा गांवकर यांनी भाज्यांची रोजच्या आहारातील उपयुक्ततेबद्दल माहिती दिली. मुख्याध्यापक सायली देसाई,स्वयंसेवक दर्शना केसरकर यांनी कार्यक्रमाचे नेटके आयोजन केल्याबद्दल उपस्थितानी कौतुक केले.
प्रतिनिधी l दोडामार्ग