चेंदवण हायस्कुल मध्ये राष्ट्रीय भूगोल दिवस उत्साहात साजरा

कुडाळ तालुक्यातील चेंदवण शिक्षणोत्तेजक मंडळ मुंबई संचलित श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय येथे 14 जानेवारी रोजी राष्ट्रीय भूगोल दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध भूगोलिक मॉडेल्सचे आकर्षक प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेने, अभ्यासपूर्ण मांडणीने व सुंदर सादरीकरणाने उपस्थितांची विशेष दाद मिळाली.
प्रदर्शनाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे अनिल अमरे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे कौतुक करत शाळेस रोख स्वरूपात देणगी देऊन संस्थेच्या कार्यास मोलाचे सहकार्य केले.
या प्रदर्शनाअंतर्गत दोन गटांत स्पर्धा घेण्यात आली. लहान गट (इ. 5 वी ते 7 वी) व मोठा गट (इ. 8 वी ते 10 वी) अशा प्रकारे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. मोठ्या गटात प्रथम युगांती विनायक मेस्त्री, द्वितीय सोहंम चंद्रकांत तुंबरे, तृतीय दिपेश रांगणेकर यांनी यश संपादन केले. लहान गटात प्रथम स्वरा प्रदीप परब, द्वितीय आराध्या शिवराम मार्गी, तृतीय सिद्धी महेश गोरिवले यांनी पारितोषिके पटकावली.
स्पर्धेचे परीक्षण अनिल अमरे व श्रीमती उर्मिला गवस यांनी केले. कार्यक्रमास संस्थेचे खजिनदार अरुण अमरे, शाळा समिती सदस्य संजय नाईक, संस्था सदस्य विजय मेस्त्री आदी मान्यवर उपस्थित होते. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी उमेश धर्णे, शरद नाईक, सुप्रिया चेंदवणकर, विजय कांबळी, निलेश तवटे व संतोष सांगळे यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांनी घेतलेली मेहनत आणि विषयातील सखोल समज पाहून मान्यवरांनी समाधान व्यक्त केले.
बक्षीस वितरण समारंभात सूत्रसंचालन अवनी शृंगारे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक माणिक पवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन संतोष सांगळे यांनी केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये भूगोल विषयाबद्दलची आवड, वैज्ञानिक दृष्टी आणि सर्जनशीलता अधिक वृद्धिंगत झाल्याचे दिसून आले.

error: Content is protected !!