बॅ. नाथ पै ज्ञान प्रबोधिनी करूळ हायस्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात

विद्यार्थ्यांच्या कलागुणांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध
‘सदिच्छा’ हस्तलिखिताचे प्रकाशन
करूळ पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित नाथ पै ज्ञान प्रबोधिनी करूळ प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ १८ जानेवारी २०२६ रोजी अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला. ज्येष्ठ साहित्यिक व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष मा. प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न झाला.
या सोहळ्याला महाराष्ट्राचे ज्येष्ठ साहित्यिक व संस्थेचे अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच सावंतवाडीचे प्रांताधिकारी श्री. समीर घारे, वास्तुविशारद श्री. संतोष तावडे, उद्योजक श्री. भाई मंत्री, श्री. अभिजीत हेगशेट्ये, तहसीलदार श्रीम. चैताली सावंत, सी. ए. श्री. सुहास पालव, ज्येष्ठ पत्रकार श्री. गणेश जेठे, संस्थेचे खजिनदार श्री. दीपेश कर्णिक, कार्यकारणी सदस्य श्री. आप्पा सावंत, श्री. दिगंबर सावंत, श्री. भास्कर सावंत आणि माजी शिक्षिका सौ. रुचिका गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते हस्तकला, रांगोळी आणि विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रयोगांचे व कलाकृतींचे मान्यवरांनी कौतुक केले. बॅ. नाथ पै यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करून व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यार्थिनींनी सादर केलेल्या ईशस्तवन व स्वागतगीताने सर्वांची मने जिंकली. यावेळी प्रशालेच्या शिक्षक व विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘सदिच्छा’ या हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले. तसेच, कै. सौ. शुभदा मधुकर्णिक यांच्या छायाचित्राचे अनावरणही यावेळी करण्यात आले. मुख्याध्यापक श्री. नारकर सर यांनी वार्षिक अहवालाद्वारे शाळेच्या वर्षभरातील शैक्षणिक व इतर प्रगतीचा आढावा मांडला. याप्रसंगी प्रशालेची माजी विद्यार्थिनी आणि सध्या ओरोस जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार म्हणून कार्यरत असलेल्या श्रीमती चैताली सावंत यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच, सेवानिवृत्त ज्येष्ठ शिक्षिका सौ. रुचिका प्रभाकर गोसावी यांचाही सन्मान करण्यात आला. सौ. अस्मिता मोरजकर यांनी गोसावी मॅडम यांच्या कार्याचा गौरव केला. शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.
अध्यक्षीय भाषणात डॉ. प्रदीप ढवळ यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या आवश्यकतेवर भर दिला. तसेच भाई मंत्री, अभिजीत हेगशेट्ये आणि चैताली सावंत यांनीही आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिक्षक श्री. सिद्धेश खटावकर यांनी केले.





