म्हणून उद्धव ठाकरेंनी आज मला या कार्यक्रमाला पाठवलं

भास्कर जाधव यांची संदेश पारकर वाढदिवसानिमित्त कार्यक्रमात माहिती

पाटबंधारे महामंडळाची उपाध्यक्ष संदेश पारकर यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

काँग्रेस जिल्हाध्यक्षांकडून पारकर याना थेट काँग्रेसमध्ये येण्याची आवाहन

कणकवली व सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्याकरिता पक्षाने निरीक्षक म्हणून मला 15 जुलैला जिल्ह्यात जायला सांगितलं. मात्र मला पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडून फोन आला की तुम्ही 15 तारखेला न जाता आदल्या दिवशीच कणकवली जा. कारण आपल्या लढवय्या कार्यकर्त्याचा वाढदिवस आहे. ही संदेश पारकर यांची खरी ताकद आहे. असे प्रतिपादन ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी केले. कणकवलीत भगवती मंगल कार्यालय येथे कोकण पाटबंधारे महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात श्री जाधव बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, उपनेते अरुण दूधवडकर, उपनेते गौरीशंकर खोत, जिल्हाप्रमुख सतीश सावंत, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, कांग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, अतुल रावराणे, युवासेना जिल्हाप्रमुख सुशात नाईक, समृद्धी पारकर, महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत, विशाखा कांबळे, अमरसेन सावंत, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर, राजू राठोड, हर्षद गावडे, युवा सेना तालुकाप्रमुख सचिन आचरेकर आदी उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना वैभव नाईक यांनी संदेश पारकर यांना पक्षाकडून मोठी जबाबदारी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करताना आम्ही शाळेत असताना संदेश पारकर यांचा वाढदिवस असा साजरा केला जायचा. आता आमची मुलं शाळेत जायला लागली तरी तोच उत्साह व ती जिद्द पारकर यांच्या या वाढदिवसा दिवशी पाहायला मिळते. अशा संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय दिला गेला पाहिजे असे मत श्री नाईक यांनी व्यक्त केले. सतीश सावंत यांनी संदेश पारकर यांना येत्या काळात राजकारणात चांगले दिवस यावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. तर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इरशाद शेख यांनी संदेश पारकर हे जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी विधानसभेत जावेत याकरिता खासदार विनायक राऊत यांनी लक्ष द्यावे असे आवाहन केले. त्याच सोबत जर होत नसेल तर त्यांनी काँग्रेसमध्ये यावे व नेतृत्व करावे असे आवाहन करत थेट व्यासपीठावरूनच संदेश पारकर यांना काँग्रेस प्रवेशाचे निमंत्रण दिले. जिल्ह्यात कोणावरही अन्याय होऊ दे त्याला वाचा फोडण्याकरता संदेश पारकर हे नेहमीच आघाडीवर असतात. त्यांना मोठी जबाबदारी पक्षाकडून मिळावी अशी अपेक्षा अतुल रावराणे यांनी व्यक्त केली. तर सुधीर नारकर यांनी जनता संदेश पारकरना 2024 मध्ये निश्चित आमदार बनवेल असा आशावाद व्यक्त केला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणत्याच गावात संदेश पारकर हे नाव ओळखत नाही अशी व्यक्ती नसेल. ही संदेश पारकर यांची लोकप्रियता सर्वांनाच भावणारी आहे. असे गौरवोद्गार शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत यांनी काढले. तर विरोध कसा करायचा आणि विरोधकावर तुटून कसं पडायचं हे संदेश पारकर यांच्याकडून मी गेली अनेक वर्ष पाहतो आहे. असे सांगत जिल्हा संपर्कप्रमुख अरून दुधवडकर यांनी श्री पारकर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. तर अमित सामंत यांनी देखील यावेळी संदेश पारकर यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी आशा सेविका तसेच विविध गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी कणकवली कॉलेजच्या एचपीसीएल हॉलमध्ये रक्तदान शिबिराचे उद्घाटन आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. शेकडो रक्तदात्यांनी यात सहभाग घेतला. संदेश पारकर यांच्या वर शुभेच्छा चा वर्षाव करत असताना अनेक कार्यकर्ते हितचिंतक यांनी कणकवलीतील भगवती मंगल कार्यालय भरून गेले होते.

दिगंबर वालावलकर/ कणकवली

error: Content is protected !!