कोकण कृषी विद्यापीठ शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल !

कुलगुरु डॉ. संजय भावे यांचे प्रतिपादन

मुळदे येथील उद्यानविद्या महाविद्यलयात डॉ. भावे यांचा सत्कार

प्रतिनिधी । कुडाळ : दर्जेदार शिक्षण, संशोधन, विस्तार कार्यामुळे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाने शेती विकासासाठी सक्षम मनुष्यबळ, कृषी तंत्रज्ञाननिर्मितीचे उल्लेखनीय कार्य केले आहे. यापुढे कोकणातील पारंपरिक शेतीचे विज्ञानधिष्ठीत शेतीत परिवर्तन करण्यासाठी येथील विद्यार्थ्यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. विशेषतः “कृषी’ च्या विद्यार्थ्यांनी निव्वळ नोकरीसाठी शिक्षण न घेता कृषी उद्योजक होऊन ग्रामीण भागात रोजगार निर्माण केला पाहिजे असे प्रतिपादन नवनिर्वाचित कुलगुरु डॉ. संजय भावे यांनी मुळदे येथे केले.
डॉ. भावे म्हणाले,”राष्ट्रीय स्तरावर पहिल्या दहा मध्ये विद्यापीठाला स्थान मिळवून देण्याचे ध्येय आम्ही ठेवले आहे. तसेच शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत कोकण कृषी विद्यापीठाचे काम पोहोचेल यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू. तरुणांसाठी आमचे व्हिजन तयार आहे अशी माहिती त्यानी दिली आहे. उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे येथे नवनियुक्त कुलगुरू महोदय डॉ.संजय भावे यांचा स्वागत व सत्कार काल करण्यात आला.


सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून टाळ्यांच्या गजरात,पुष्पवृष्टी करून फटाके लावून जल्लोषात स्वागत केले. डॉ.भावे व त्यांच्या पत्नी सौ.स्नेहल भावे यांचे विद्यार्थिनींनी औक्षण केले. सहयोगी अधिष्ठाता डॉ.प्रदीप हळदवणेकर यांनी कुलगुरू महोदयांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कुलगुरू महोदय यांच्या शुभहस्ते प्रक्षेत्रावर नारळाच्या रोपाची लागवड करण्यात आली.
सदर सोहळ्यासाठी व्यासपीठावर कुलगुरू महोदय डॉ.संजय भावे यांच्या समवेत सहयोगी अधिष्ठाता डॉ.प्रदीप हळदवणेकर, मत्स्य संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ.नितीन सावंत, विद्यापीठ अभियंता निनाद कुलकर्णी महाविद्यालयाचे सहाय्यक कुलसचिव विलास यादव, मुळदे गावच्या उपसरपंच अपूर्वा पालव, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, सिंधुदुर्ग समाजकल्याण उपायुक्त प्रमोद जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवर मंडळींचे स्वागत विद्यार्थिनींनी स्वागत गीताने व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.
डॉ.संदीप गुरव यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. कुलगुरू महोदय यांच्या आजपर्यंतच्या कार्याचा आढावा मांडण्यात आला. त्यानतंर डॉ.संदीप गुरव, प्रा. हर्षवर्धन वाघ, डॉ.जया तुमडाम, डॉ.महेश शेडगे, प्रा.प्रशांत देबाजे, डॉ.परेश पोटफोडे, डॉ.नितीन सावंत, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. उमेश तोरसकर व डॉ.प्रदीप हळदवणेकर यांनी डॉ.भावे सरांच्या स्वभावाचे विविध पैलू आपल्या मनोगतातून मांडले. उद्यानविद्या महाविद्यालय परिवारातर्फे कुलगुरू महोदय यांचा शाल, श्रीफळ,विद्यार्थ्यांनी तयार केलेला आकर्षक पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना “मी या सत्काराने भारावून गेलो असे उदगार कुलगुरू डॉ. भावे यांनी काढले. उपस्थित विद्यार्थी व प्राध्यापक वर्गाशी हितगुज केले.
सर्व उपस्थित पत्रकार व मुळदे गावच्या उपसरपंच सौ. अपूर्वा पालव यांचा कुलगुरू महोदय यांच्या हस्ते कोकेडेमा रोपाची आठवण भेट देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी नवनियुक्त कुलगुरू महोदयांनी महाविद्यालयाच्या नूतन इमारतीस भेट देऊन पाहणी केली व कामाच्या पुर्तते बाबत विद्यापीठ अभियंता यांना सूचना केल्या.
डॉ.परेश पोटफोडे यांनी सर्व उपस्थित मान्यवर, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ.संदीप गुरव यांनी केले. वंदे मातरम् ने कार्यक्रमाची सांगता झाली.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!