पॉकेटमनीतून बचत; गरजूंना मदतीचा हात!

कुडाळ हायस्कूल-ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनींचा सामाजिक बांधिलकीचा आदर्श

सामाजिक बांधिलकी आणि संवेदनशीलतेचा आदर्श घालून देत कुडाळ हायस्कूल-ज्युनिअर कॉलेजच्या बारावी सायन्स ‘बी’च्या विद्यार्थिनींनी आपल्या पॉकेटमनीतून बचत करून गरजूंसाठी मदतीचा हात पुढे केला. विद्यार्थिनींनी सुरेश बिर्जे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्ट, पिंगुळी संचलित जिव्हाळा सेवाश्रम, माड्याचीवाडी येथील लाभार्थींना अन्नधान्य व विविध जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.
विद्यार्थ्यांना पालकांकडून मिळणाऱ्या पॉकेटमनीमधून काही रक्कम नियमितपणे बाजूला काढून बचत करण्याची सवय लावण्यात आली होती. या बचतीतून विद्यार्थिनींनी अन्नधान्य व अन्य आवश्यक वस्तू खरेदी करून त्या सेवाश्रमातील लाभार्थींना प्रेमपूर्वक अर्पण केल्या. ‘दान कुठे आणि कोणासाठी करावे?’ याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगत हा उपक्रम शिक्षक वेंगुर्लेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.
यावेळी कुडाळ हायस्कूलचे शिक्षक वेंगुर्लेकर सर, मकरंद राऊळ सर, परब सर आणि प्राजित परब उपस्थित होते. विद्यार्थिनींच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत जिव्हाळा सेवाश्रमाच्या वतीने त्यांचा गुलाबपुष्प व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जयप्रकाश प्रभू, गितांजली बिर्जे, प्राजक्ता केळुसकर आणि अरुण परब उपस्थित होते.
याचबरोबर विद्यार्थिनींनी सविता आश्रमालाही शैक्षणिक साहित्य, किराणा साहित्य तसेच सॅनिटरी पॅडचे वाटप करून सामाजिक संवेदनशीलतेचा परिचय दिला.
स्वतःच्या पॉकेटमनीतून बचत करून गरजूंसाठी मदतीचा हात पुढे करण्याचा विद्यार्थिनींचा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरला आहे. ‘स्वतःसाठी जगताना समाजासाठीही काहीतरी देणे’ हा सुंदर संदेश या उपक्रमातून विद्यार्थिनींनी समाजासमोर ठेवला आहे.

error: Content is protected !!