संभाव्य दुष्काळ व पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर कुडाळ नगरपंचायत सज्ज

पाणीपुरवठ्यात अर्ध्या तासाची कपात

बंधारे, विहिरींचा गाळ उपसा आणि टँकर नियोजनावर भर

तालुक्याचा दुष्काळ ट्रिगर-१ मध्ये समावेश झाल्याच्या पार्श्वभूमीवर आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी कुडाळ नगरपंचायत प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांना सुरुवात केली आहे. पिण्याच्या पाण्याची उपलब्धता कायम ठेवण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्याचा निर्णय ७ ऑक्टोबर रोजी झालेल्या नगरपंचायतीच्या विशेष सभेत घेण्यात आला.
पावशी धरण तसेच भंगसाळ नदीतील उपलब्ध पाणीसाठा जपून वापरणे आवश्यक असल्याने सध्याच्या नियमित पाणीपुरवठ्याच्या कालावधीत अर्ध्या तासाची कपात करण्यात येणार आहे. पाणीटंचाईची तीव्रता वाढू नये यासाठी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन नगरपंचायतीने नागरिकांना केले आहे.
शहरातील पाणीसाठा वाढविण्यासाठी विविध ठिकाणी बंधारे उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी कुंभारवाडी, काविलकाटे, नाबरवाडी आणि तुपटवाडी परिसरातील योग्य ठिकाणांची पाहणी करण्यात येणार आहे. या उपक्रमात अशासकीय संस्था, नागरिक, उद्योजक, पत्रकार संघ, व्यापारी संघ, लायन्स क्लब, रोटरी क्लब आदींचा सहभाग घेण्यात येणार आहे.
कुडाळ शहरातील नगरपंचायतीच्या मालकीच्या जागांमध्ये जलतारा प्रकल्प राबविण्याचेही नियोजन आहे. तसेच मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात पाणीपुरवठ्याची आवश्यकता वाढल्यास टँकर भाड्याने घेऊन पाणीपुरवठा करण्याची पूर्वतयारी करण्यात येणार आहे.
नगरपंचायतीच्या मालकीच्या बारमाही विहिरींमधील गाळ उपसा करून आवश्यकतेनुसार त्यातील पाणी शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी वापरण्यात येणार आहे. शहरातील जलवाहिन्यांमधील गळती दुरुस्तीचे काम सुरू असून, नागरिकांनी आपल्या परिसरातील पाणीगळतीची माहिती नगरपंचायतीला द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
यासाठी नगरपंचायतीच्या टोल फ्री क्रमांक १८००२३३१४३६ वर संपर्क साधता येणार आहे. नळ जोडण्यांमधून होणारी पाणीगळती रोखण्यासाठी विशेष पथकही तैनात करण्यात आले आहे. अनधिकृत नळजोडण्या आढळल्यास त्या तत्काळ खंडित करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.
याशिवाय शहरात वृक्षारोपण, ‘पाणी वाचवा, पाणी अडवा’ यासह विविध जलसंवर्धनविषयक जनजागृती उपक्रम राबविण्यात येणार आहेत. संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा वापर काटकसरीने करून नगरपंचायत प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!