तीन वर्षांपासून फरार असलेल्या संशयितास ताडदेव मुंबईतून अटक

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कामगिरी

कणकवली पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून फरार असलेल्या संशयितास सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ताडदेव, मुंबई येथून शिताफीने ताब्यात घेतले. लीलाधर मोडाराम सुथार (वय ३९, मूळ रा. पिंपासार, नागोर, राजस्थान) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे.
कणकवली पोलिस ठाण्यात १५ जून २०२३ रोजी भादंवि कलम ३८१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. नाथपै नगर, कणकवली येथील सतीश विजय नाईक यांच्या घरी सुमारे वर्षभर काम करणाऱ्या सुथार याने त्यांच्या पत्नीचे सुमारे ३.७ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, तसेच सुमारे एक लाख रुपये किमतीचे लाकडी प्लायवूड असा मुद्देमाल चोरी करून पलायन केल्याचे पोलिसांनी सांगितले.
गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयिताने गोवा तसेच राजस्थानमधील जयपूर, उदयपूर आदी ठिकाणी वास्तव्य करून सुमारे तीन वर्षे स्वतःचे अस्तित्व लपवले होते. दरम्यान, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीतून तो मुंबईतील ताडदेव परिसरात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली.
या माहितीच्या आधारे पोलिस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ६ ऑक्टोबर रोजी आराध्या आवान बिल्डिंगजवळ, भाटिया हॉस्पिटलच्या मागील बाजूस, ताडदेव येथे सापळा रचून संशयित सुथार याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याची वैद्यकीय तपासणी करून पुढील कार्यवाहीसाठी त्याला कणकवली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई सिंधुदुर्गचे पोलिस अधीक्षक मोहन दहिकर, अपर पोलिस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार आणि पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक अनिल हाडळ, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुरेश राठोड, हेड कॉन्स्टेबल जॅकसन घोन्सालविस, पोलिस कॉन्स्टेबल अमर कांडर तसेच कणकवली पोलिस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल पांडुरंग पांढरे सहभागी झाले होते.

error: Content is protected !!