‘आमची बालके, आमची जबाबदारी’

कुडाळमध्ये पोषण आहार जनजागृती रॅली उत्साहात
बालकांच्या आरोग्य, पोषण आणि सर्वांगीण विकासाचा संदेश
लहान मुलांचे योग्य पोषण, आरोग्य आणि सर्वांगीण विकासाबाबत जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक बालविकास सेवा योजना (ICDS) प्रकल्प, कुडाळ यांच्या वतीने ‘पोषण माह’ अभियानांतर्गत कुडाळ शहरात पोषण आहार जनजागृती रॅली उत्साहात काढण्यात आली.
‘आमची अंगणवाडी, आमची जबाबदारी’ या संकल्पनेवर आधारित या रॅलीतून बालकांच्या आरोग्य व पोषणाची जबाबदारी ही केवळ प्रशासनाची नसून पालक, समाज, स्वयंसेवी संस्था आणि लोकप्रतिनिधी या सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचा संदेश देण्यात आला.
या रॅलीमध्ये कुडाळ तालुक्यातील अंगणवाडी सेविका, बालविकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. हातात जनजागृतीपर फलक घेत आणि गांधी टोप्या परिधान करून अंगणवाडी सेविकांनी शहरातून रॅली काढत नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.
बालकांना लहान वयापासून सकस आणि संतुलित आहार मिळणे, त्यांच्या आरोग्याची योग्य काळजी घेणे तसेच कुपोषण टाळण्यासाठी पालकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, हा रॅलीचा प्रमुख उद्देश होता. कुडाळ तालुक्यातील भावी पिढी सुदृढ, निरोगी आणि सक्षम व्हावी, यासाठी पोषणाबाबत प्रत्येक कुटुंबाने जागरूक राहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.






