‘यशस्वी जीवनाची दिशा स्वतः ठरवा; आवडीच्या क्षेत्रात कष्ट करा’ : दादा भुसे

मंत्री भुसे यांची बॅ नाथ पै सेंट्रल स्कुलला भेट
शिक्षक ज्ञानदानासोबत विद्यार्थ्यांना जीवन जगण्याची दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतात. मात्र, आयुष्यात कोणत्या दिशेने जायचे, हे विद्यार्थ्यांनी स्वतः ठरवायचे आहे. आपल्या आवडीच्या क्षेत्राची निवड करून त्या दिशेने सातत्याने कष्ट केल्यास यशस्वी होता येते, असा संदेश राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी विद्यार्थ्यांना दिला.
महाराष्ट्र शासनाच्या ‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत कुडाळ येथील बॅरिस्टर नाथ पै सेंट्रल स्कूलला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.
बॅरिस्टर नाथ पै यांच्या नावाने सुरू असलेल्या आणि त्यांच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या या शिक्षण संस्थेच्या कार्याचे दादा भुसे यांनी कौतुक केले. वामनराव पै यांच्या ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या विचारावर श्रद्धा ठेवून संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर व त्यांचे सहकारी शैक्षणिक क्षेत्रात चांगले काम करत असल्याचे सांगत त्यांनी समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांनीही संस्थेतील विविध उपक्रमांचा लाभ घेत आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करावा, असे आवाहन त्यांनी केले. संस्थेच्या पुढील वाटचालीस तसेच विद्यार्थ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.
‘चला शाळेत जाऊया’ अभियानाच्या निमित्ताने शाळेत आगमन झालेल्या दादा भुसे यांचे संस्थेच्या वतीने शाल, श्रीफळ आणि शिवराज मुद्रा देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी त्यांना शिस्तबद्ध पद्धतीने गार्ड ऑफ ऑनर दिला.
एनसीसीच्या विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध स्वागताचे कौतुक करताना दादा भुसे यांनी विद्यार्थ्यांनी एनसीसीसोबतच संस्थेतील विविध कौशल्याधारित उपक्रम व अभ्यासक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. शिक्षणासोबतच विविध कौशल्ये आत्मसात केल्याने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी चेअरमन उमेश गाळवणकर, शिवसेना ओबीसी व्हीजेएनटी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉ. श्रीधर सगुण पेडणेकर, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा दीपलक्ष्मी पडते, जिल्हा परिषदेचे माजी जिल्हाध्यक्ष काका कुडाळकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, जिल्हा परिषद सदस्य रुपेश कानडे, कुडाळ पंचायत समिती सभापती मिलिंद नाईक, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बोरसे, प्राथमिक शिक्षण विभागाच्या प्रभारी शिक्षणाधिकारी सविता परब, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर तसेच शिक्षण विभागातील विविध अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंदार जोशी यांनी केले.






