पोषण आहार स्वयंपाकींच्या थकीत मानधनासाठी कुडाळात शिक्षक समितीचे आंदोलन

चार महिन्यांचे मानधन तातडीने देण्याची मागणी
सभापती मिलिंद नाईक यांनी घेतली दखल
शालेय पोषण आहार योजनेतील स्वयंपाकी व मदतनीसांचे प्रलंबित मानधन तसेच शिक्षकांच्या विविध आर्थिक, सेवाविषयक आणि शैक्षणिक प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, शाखा कुडाळच्या वतीने ७ ऑक्टोबर रोजी कुडाळ पंचायत समितीसमोर लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात तालुक्यातील ग्रामीण भागातील पोषण आहार स्वयंपाकी, शिक्षक व शिक्षिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
प्रधानमंत्री शालेय पोषण शक्ती योजनेअंतर्गत कार्यरत स्वयंपाकी व मदतनीसांचे जून ते सप्टेंबर २०२६ या चार महिन्यांचे मानधन अद्याप प्रलंबित असल्याचा दावा शिक्षक समितीने केला आहे. अत्यल्प मानधनावर विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची जबाबदारी पार पाडणाऱ्या स्वयंपाकी व मदतनीसांचे मानधन प्रलंबित ठेवणे गंभीर असल्याचे समितीने म्हटले आहे.
आंदोलनाची कुडाळ पंचायत समितीचे सभापती मिलिंद नाईक यांनी दखल घेत आंदोलनस्थळी उपस्थित राहून आंदोलकांशी चर्चा केली. यावेळी गटविकास अधिकारी प्रवीण हिर्लेकर, गटशिक्षणाधिकारी कैलास राऊत, कुणाल तेंडोलकर आदी उपस्थित होते.
शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत प्रशासनाचे वेळोवेळी लक्ष वेधूनही अपेक्षित गतीने कार्यवाही होत नसल्याने हे लाक्षणिक आंदोलन करण्यात आल्याचे शिक्षक समितीने सांगितले. शिक्षकांचा वेळ प्रशासकीय माहिती भरण्यात न जाता विद्यार्थ्यांचे अध्यापन व गुणवत्ता वाढविण्यासाठी वापरला जावा, अशी भूमिका समितीने मांडली.
यावेळी इयत्ता चौथीची पाठ्यपुस्तके तसेच विविध इयत्तांची कलाशिक्षण, व्यावसायिक शिक्षण व शारीरिक शिक्षणाची पाठ्यपुस्तके तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. तसेच शिक्षकांच्या वेतननिश्चितीतील त्रुटी दूर करणे, सहावा व सातवा वेतन आयोगातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे, केंद्रप्रमुख पदोन्नतीनंतरची वेतननिश्चिती करणे आदी आर्थिक व सेवाविषयक प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.
शिक्षकांना वारंवार ऑनलाइन कामे देताना त्यांच्या अध्यापनावर परिणाम होऊ नये, नियमित ऑनलाइन माहिती संकलनासाठी शनिवारचा दिवस नियोजित करावा तसेच आवश्यक संगणक, इंटरनेट, डेटा व तांत्रिक सुविधा शासनाने उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणीही करण्यात आली. ‘शिक्षक हा शिक्षक आहे; तो डाटा ऑपरेटर नाही,’ अशी भूमिका समितीने मांडली.
कुडाळ पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील हेड क्लर्कचे रिक्त पद तातडीने भरणे, शाळांमधील नादुरुस्त किचन शेडच्या दुरुस्तीसाठी अनुदान उपलब्ध करून देणे, समग्र शिक्षा अंतर्गत शाळांना मंजूर होणारे पूर्ण अनुदान मिळवून देणे, विद्यार्थ्यांसाठी दुसरा गणवेश तातडीने उपलब्ध करून देणे तसेच TAN नंबर काढण्यासंदर्भात मुख्याध्यापकांसाठी कार्यशाळा आयोजित करणे, या मागण्याही यावेळी करण्यात आल्या.
लोकशाही व सनदशीर मार्गाने हे आंदोलन शांततामय आणि शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले. शिक्षकांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कार्यवाही न झाल्यास संघटनेच्या माध्यमातून यापुढेही आवाज उठविला जाईल, असा इशारा राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांनी दिला.
यावेळी तालुकाध्यक्ष शशांक आटक, राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर, कमलताई परुळेकर, जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस, जिल्हा सरचिटणीस तुषार आरोसकर, राज्य पदाधिकारी सचिन मदने, चंद्रकांत अणावकर, नंदकुमार राणे, दोडामार्ग तालुकाध्यक्ष महेश काळे, प्रशांत झालबा, सावंतवाडी तालुकाध्यक्ष गोविंद शेर्लेकर, सुहास गावडे, अवधूत जाधव, पतपेढी संचालक नारायण नाईक, चंद्रसेन पाताडे, नामदेव जांभवडेकर, अखिल प्राथमिक शिक्षक संघाचे कुडाळ अध्यक्ष यल्लापा दळवी, शेडगे, पदवीधर केंद्रप्रमुख सभेचे धोंडू रेडकर, कुडाळ तालुका महिला आघाडी अध्यक्षा संजना पेडणेकर, सचिव गौरवी बांबार्डेकर, संतोष वारंग यांच्यासह जिल्हाभरातील शिक्षक समितीचे पदाधिकारी, शिक्षक व स्वयंपाकी उपस्थित होते.






