नेरूरमध्ये वनराई बंधारा पूर्ण

रुपेश पावसकर यांची संकल्पना
नेरूर पंचक्रोशीत ५० बंधारे उभारण्याचे नियोजन
‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेतून जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांच्या संकल्पनेतून नेरूर येथे वनराई बंधाऱ्याचे काम पूर्ण करण्यात आले. या बंधाऱ्यामुळे नेरूर ख्रिश्चन वाडी, कलमेवाडी आणि माणकादेवी वाडीतील शेतकरी व ग्रामस्थांना पाणी साठवणुकीचा फायदा होणार आहे.
पावसाचे पाणी अडवून त्याचा योग्य पद्धतीने साठा व्हावा तसेच भूगर्भातील पाण्याची पातळी वाढावी, या उद्देशाने बंधाऱ्याच्या बांधकामात प्लास्टिकचा वापर करण्यात आला आहे. या उपक्रमात ग्रामस्थांनी श्रमदान करून सक्रिय सहभाग नोंदविला.
दरम्यान, नेरूर पंचक्रोशीत आगामी काळात ५० वनराई बंधारे उभारण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी सांगितले. पाणीटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सामाजिक कार्यकर्ते गोटू नाईक यांनी सांगितले की, ग्रामस्थांच्या मागणीनुसार ज्या ठिकाणी वनराई बंधाऱ्याची आवश्यकता आहे, त्या ठिकाणी श्रमदानाच्या माध्यमातून बंधारे उभारून पाणीसाठा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल. यामुळे पाणीटंचाईवर मात करण्यास मदत होईल.
यावेळी माजी सरपंच शेखर गावडे, सामाजिक कार्यकर्ते गोटू नाईक, पीटर फर्नांडिस, मंगेश रेवणकर, दिनेश पेडणेकर, देऊ नाईक, आतुलो फर्नांडिस, सदानंद म्हापणकर, विजय दाभोलकर, अमर कदम, तलाठी भाऊ यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.






