स्थानिक शिक्षकांना प्राधान्य द्या; अशैक्षणिक कामांचा बोजा कमी करा

प्राजक्त चव्हाण यांची शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे मागणी

शिक्षकांच्या विविध प्रश्नांचे निवेदन

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यादरम्यान कुडाळ येथील शासकीय विश्रामगृहात शिवसेना कुडाळ-मालवण विधानसभा प्रमुख (अ.जा.) तथा श्रमिक कामगार संघटनेचे अध्यक्ष प्राजक्त पंढरी चव्हाण यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी शिक्षक व शिक्षण क्षेत्रातील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत निवेदन सादर करून मागण्यांकडे शिक्षणमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले.
राज्यात सुरू असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक शिक्षक उमेदवारांना प्राधान्य देण्यात यावे, अशी प्रमुख मागणी चव्हाण यांनी केली. परजिल्ह्यातील शिक्षकांची नियुक्ती झाल्यानंतर काही वर्षांनी ते आपल्या मूळ जिल्ह्यात परतल्यास स्थानिक पातळीवरील शिक्षकांची पदे पुन्हा रिक्त होतात. परिणामी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रक्रियेवर परिणाम होण्याबरोबरच स्थानिक शिक्षक उमेदवारांनाही संधीपासून वंचित राहावे लागते, असे निवेदनात नमूद करण्यात आले.
शिक्षकांना देण्यात येणारी अशैक्षणिक कामे कमी करून त्यांना अध्यापनासाठी अधिक वेळ उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही करण्यात आली. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षकांचा अधिकाधिक वेळ वर्गातील अध्यापनासाठी उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे चव्हाण यांनी शिक्षणमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.
याशिवाय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कला शिक्षक तसेच शारीरिक शिक्षण शिक्षकांची पदे सर्व शाळांमध्ये भरण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना, क्रीडा कौशल्यांना आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळेल, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले.
बांधकाम कामगारांच्या मुलांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक असलेले बोनाफाईड प्रमाणपत्र व हजेरी प्रमाणपत्राचे छापील नमुने सर्व प्राथमिक शाळांमध्ये उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणीही करण्यात आली.
चव्हाण यांनी सादर केलेल्या निवेदनावर शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी तातडीने शेरा मारून ते पुढील कार्यवाहीसाठी आपल्या स्वीय सहाय्यकांकडे सुपूर्द केले. संबंधित मागण्यांबाबत आपणही आग्रही असून त्यावर लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही मंत्री भुसे यांनी दिल्याचे प्राजक्त चव्हाण यांनी सांगितले.
यावेळी वरिष्ठ लिपिक पालकर, ठुंबरे आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!