कणकवली उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारातील सिटीस्कॅन ची सेवा मोफत द्या अन्यथा आंदोलन छेडणार

ठाकरे सेनेचे कणकवली विधानसभा प्रमुख सुशांत नाईक यांच्यासह शिवसेनेच्या शिष्टमंडळाचा वैद्यकीय अधीक्षकांना इशारा
सप्टेंबर महिन्यात तब्बल 300 रुग्णांचे पैसे घेतल्याची बाब उघड
पैसे घेतलेल्या रुग्णांच्या बाबतचा अहवाल शल्यचिकित्सांना पाठवणार – डॉ. पाटील
कणकवली उपजिल्हा रुग्णालयामध्ये असणाऱ्या क्रस्ना डायग्नोस्टिक सेंटर मार्फत सिटीस्कॅन ची सेवा रुग्णांना मोफत न देता रुग्णांकडून पैसे घेतले जात आहेत. त्यामुळे ही सेवा जर मोफत सुरू केली नाही तर उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षकांच्या दालना बाहेर आंदोलन छेडू. पालकमंत्री नितेश राणे यांनी यापूर्वी जनतेला मोफत सेवा सुरू करण्याबाबतचे आश्वासन दिले ते खोटे ठरले. भाजपा पदाधिकाऱ्यांनी देखील जनतेला पालकमंत्र्यांच्या सांगण्यावरून अशी आश्वासने दिली ती देखील खोटी ठरली. पालकमंत्री जनतेसह आपल्या पदाधिकाऱ्यांना देखील फसवतात असा आरोप ठाकरे सेनेचे कणकवली विधानसभा प्रमुख व युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केला. तर ज्या पद्धतीने जुगारावर पालकमंत्र्यांनी रेड मारली तशीच रेड कधीतरी उपजिल्हा रुग्णालयावर मारावी असा खोचक टोला तालुकाप्रमुख राजू राठोड यांनी लगावला.
ठाकरे सेनेच्या वतीने आज कणकवली उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात असणाऱ्या सिटीस्कॅन च्या सेवेबाबत वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर पंकज पाटील यांना जाब विचारला. यावेळी तालुकाप्रमुख राजू राठोड युवा सेना तालुकाप्रमुख उत्तम लोके नगरसेवक संकेत नाईक माजी युवा सेना जिल्हाप्रमुख ॲड. हर्षद गावडे विलास गुडेकर अजित काणेकर आदी उपस्थित होते. पंकज पाटील यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. डॉक्टरांचे काम चांगले आहे. डॉक्टर येथे चांगली सेवा देतात डॉक्टरांच्या कामाबद्दल आम्हाला आक्षेप नाही. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत डॉक्टर सेवा देतात हे रुग्णांसाठी फायदेशीर आहे. परंतु क्रस्ना डायग्नोस्टिक सेंटर मार्फत सिटीस्कॅन ची सेवा मोफत देण्याचे शासनाचे धोरण असताना आता रुग्णांकडून पैसे कसे घेतले जातात असा सवाल करण्यात आला. यावेळी या डायग्नोस्टिक सेंटरच्या कर्मचाऱ्याला बोलावण्यात आले. त्यावेळी सप्टेंबर महिन्यामध्ये जवळपास 3 00 लोकांचे पैसे घेतल्याची बाब समोर आली. जर मोफत सेवा असेल तर हे पैसे कसे घेतले? असा सवाल सुशांत नाईक यांनी केला. त्यावर डॉक्टर पाटील यांनी शासनाच्या धोरणाप्रमाणे आयपीडी व ओपीडी मधील रुग्णांचे पैसे घेऊ नका असे आदेश आहेत. व इतर बाहेरील खाजगी रुग्णालयातून येणाऱ्या रुग्णांना नाम मात्र शुल्क ठेवण्यात आले आहे असे सांगण्यात आले. सर्व रुग्णांना एकसारखीच मोफत सेवा द्या अन्यथा तुमच्या कार्यालयावर आंदोलन छेडू असा इशारा युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी दिला. याबाबत आजच्या आंदोलनाच्या अनुषंगाने जिल्हा शल्यचिकित्स यांना पत्रव्यवहार करणार असल्याची माहिती डॉक्टर पाटील यांनी दिली.






