कणकवली प्रांताधिकारी कार्यालयातील अरुण सावंत यांचे निधन

उद्या सकाळी नरडवे येथे मूळ गावी होणार अंत्यसंस्कार
मूळ कणकवली तालुक्यातील नरडवे येथील रहिवासी व कणकवली प्रांताधिकारी कार्यालयात कंत्राटी भूसंपादन अव्वल कारकून या पदावर गेले काही वर्ष कार्यरत असणारे अरुण बळीराम सावंत (वय 61) यांचे आज मंगळवारी दुपारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. कणकवली प्रांताधिकारी कार्यालयात काम करत असताना अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले व तेथे त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांनी त्यांना तातडीने कणकवलीतील खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यापूर्वी त्यांचे निधन झाले होते. अरुण सावंत हे गेले अनेक वर्ष भूसंपादन या प्रक्रियेत कंत्राटी पद्धतीने काम करत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात देखील त्यांनी काम केले होते. भूसंपादन प्रक्रियेतील अनेक बारकावे व खडांखडा माहिती असणारी व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असे. कणकवली मधील महामार्ग भूसंपादन प्रक्रियेत त्यांनी केलेले काम हे महत्त्वपूर्ण होते. त्या प्रक्रियेत त्यांचा अनेक बारकाव्यांचा व प्रकरणांचा अभ्यास देखील होता. गेली काही वर्ष कणकवली प्रांताधिकारी कार्यालयात ते कार्यरत होते. कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत असले तरी त्यांचा या विषयाचा बारकाव्यांचा अभ्यास असल्यामुळे अनेक नागरिक त्यांच्याकडे माहितीसाठी जात. त्यांच्यावर उद्या बुधवारी सकाळी 9 वाजता नरडवे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व भाऊ असा परिवार आहे.
दिगंबर वालावलकर कणकवली






