कुडाळ दिवाणी न्यायालयात १२ सप्टेंबरला राष्ट्रीय लोकअदालत

न्यायालयीन प्रलंबित व वादपूर्व प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्याची संधी
मुंबई उच्च न्यायालय, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांच्या निर्देशानुसार कुडाळ येथील दिवाणी न्यायालयात शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. तालुका विधी सेवा समिती, कुडाळ आणि तालुका बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही लोकअदालत होणार आहे.
दिवाणी न्यायालयात प्रलंबित असलेली दिवाणी प्रकरणे तसेच तडजोडीस पात्र फौजदारी प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्याची या लोकअदालतीच्या माध्यमातून संधी उपलब्ध होणार आहे. ज्या पक्षकारांना आपले प्रकरण चर्चेद्वारे मिटवायचे आहे, त्यांनी लोकअदालतीस उपस्थित राहावे. आवश्यकतेनुसार उभय पक्षकारांच्या संमतीने चर्चेची तारीख व माध्यम निश्चित करण्यात येईल.
तसेच राष्ट्रीयकृत व सरकारी बँका, स्वायत्त संस्था, ग्रामपंचायत आणि नगरपंचायत यांच्याकडील वादपूर्व प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी संबंधितांनी आपली प्रकरणे तालुका विधी सेवा समिती, कुडाळ या कार्यालयाकडे लवकरात लवकर दाखल करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून पक्षकारांना वेळ व खर्चाची बचत करून परस्पर संमतीने वाद निकाली काढण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे संबंधित पक्षकारांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा आणि लोकअदालत यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन दिवाणी न्यायाधीश (क स्तर), कुडाळ तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष जी. ए. कुलकर्णी यांनी केले आहे.






