कुडाळ आगार व्यवस्थापक रोहित नाईक यांना ४८ तासांत खुलासा करण्याची नोटीस

विविध तक्रारीवरून जि. प. उपाध्यक्ष दादा साईल यांनी विभाग नियंत्रकांना धरले धारेवर
कुडाळ आगारातील विविध तक्रारी आणि महिला प्रवाशांशी कथित उर्मट वर्तनाच्या मुद्द्यावरून बुधवारी आगारात चांगलाच गदारोळ झाला. जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, जिल्हा परिषद सदस्या दीप्ती पडते, माजी जिल्हा परिषद सदस्या आना भोगले, शिवसेना पदाधिकारी प्राजक्त चव्हाण आणि भाजप प्रदेश सहसंयोजक निलेश तेंडुलकर यांनी कुडाळ आगार व्यवस्थापनाच्या कारभाराबाबत विभाग नियंत्रक दीपक घोडे यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर कुडाळ आगार व्यवस्थापक रोहित नाईक यांना ४८ तासांत खुलासा सादर करण्याची कारणे दाखवा नोटीस देण्यात आली.
रविवार, ४ ऑक्टोबर रोजी कुडाळ स्थानकावरून पिंगुळी येथे आध्यात्मिक बैठकीसाठी जाणाऱ्या महिला प्रवाशांशी कुडाळ-बेळगाव बसच्या चालक व वाहकाने उर्मटपणे वर्तन केल्याची तक्रार जिल्हा परिषद सदस्या दीप्ती पडते यांच्याकडे करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत दीप्ती पडते यांच्यासह जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, माजी जिल्हा परिषद सदस्या आना भोगले, भाजप प्रदेश सहसंयोजक निलेश तेंडुलकर आणि शिवसेना पदाधिकारी प्राजक्त चव्हाण यांनी कुडाळ आगारात जाऊन आगार व्यवस्थापक रोहित नाईक यांच्याकडे जाब विचारला.
यावेळी विभाग नियंत्रक दीपक घोडे हे आगार तपासणीसाठी उपस्थित होते. दीप्ती पडते यांनी आगार व्यवस्थापकांकडून लोकप्रतिनिधींचे फोन न उचलणे अथवा फोन कट करणे तसेच लोकप्रतिनिधींना अपेक्षित सन्मानाची वागणूक न देण्याचा आरोप केला.
जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांनी आगार व्यवस्थापकांची तात्काळ बदली करण्याची मागणी केली. तसेच आगार व्यवस्थापनाच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत योग्य ती कारवाई न झाल्यास आंदोलनात्मक भूमिका घेण्याचा इशारा दिला.
माजी जिल्हा परिषद सदस्या आना भोगले यांनीही आगार व्यवस्थापकांकडून आपल्याला आलेल्या कथित वाईट अनुभवांचा उल्लेख केला. कुडाळ आगारातील आतापर्यंतच्या व्यवस्थापकांपैकी रोहित नाईक यांचा कारभार सर्वाधिक असमाधानकारक असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच ठराविक चालक-वाहकांना आगार व्यवस्थापनाकडून विशेष प्राधान्य दिले जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
वालावल ग्रामस्थांच्या तक्रारीवरूनही जाब
१० ऑगस्ट २०२६ रोजी वालावल ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीवर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा मुद्दा उपस्थितांनी विभाग नियंत्रकांच्या निदर्शनास आणून दिला. तक्रार करून दोन महिने उलटूनही कारवाई का झाली नाही, असा सवाल उपस्थित करण्यात आला. तसेच आगारातील तक्रार वहीनुसार तब्बल १३ तक्रारींवर कार्यवाही झालेली नसल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले.
या सर्व तक्रारींची गंभीर दखल घेत उपस्थितांनी आगार व्यवस्थापकांना तत्काळ कारणे दाखवा नोटीस देण्याची मागणी केली. जोपर्यंत नोटीस दिली जात नाही, तोपर्यंत आगारातून निघणार नसल्याची ठाम भूमिका त्यांनी घेतली. त्यानंतर विभाग नियंत्रक दीपक घोडे यांनी कार्यालयीन कार्यवाही सुरू करून रोहित नाईक यांना ४८ तासांत खुलासा सादर करण्याची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.
वालावल येथील घटनेप्रकरणी ‘प्रगत सिंधुदुर्ग’चे दयानंद चौधरी यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक तसेच परिवहन व बंदरे मंत्रालयाच्या अपर मुख्य सचिवांकडे कठोर प्रशासकीय कारवाईची मागणी केली असल्याचेही यावेळी विभाग नियंत्रकांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
एकाच चालकाला महिनोन्महिने बेळगाव ड्युटी?
कुडाळ आगारातून एकाच चालकाला गेल्या अनेक महिन्यांपासून बेळगाव ड्युटी दिली जात असल्याचा मुद्दाही यावेळी उपस्थित करण्यात आला. आगार प्रशासनाने उपस्थितांसमोर ही बाब मान्य केल्याचा दावा करण्यात आला. यावर जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांनी या प्रकाराला आगार व्यवस्थापकच सर्वस्वी जबाबदार असल्याचे सांगत चौकशीची मागणी केली.
दरम्यान, कुडाळ एस.टी. स्थानकातील बंद असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा मुद्दा निलेश तेंडुलकर यांनी उपस्थित केला. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही यंत्रणा तातडीने सुरू करण्याची मागणीही करण्यात आली.






