छोटेसे आवाहन… आणि ५५ जणांचा यशस्वी रांगणागड ट्रेक

लहानथोर सर्व वयोगातील सर्वानी एकत्र येत राबवली ट्रेक मोहीम

पिंगुळीतील सखे सोबती गृपचे सहकार्य

आजच्या मोबाईलच्या युगात लहानमुले, तरुण, महिला यांच्यासह सर्वानी एकत्र यावे, निसर्गाच्या सानिध्यासह गिर्यारोहणासारख्या धाडसी खेळाचा आनंद घ्यावा यासाठी कुडाळ. पिंगुळी आणि आसपासच्या काही जणांनी एकत्र येत रविवारी रांगणागड ट्रेकचे आयोजन केले होते. पाच-सहा जणांच्या गृपने जाण्यापेक्षा ५०-६० जणांनी एकत्र जाऊ हि या ट्रेक मागची संकल्पना विविध वयोगटातील तब्ब्ल ५५ जणांनी सहभागी होत प्रत्यक्षात आणली. यासाठी पिंगुळीतलं सखे सोबती ग्रुपने विशेष पुढाकार घेतला होता.
पावसाळा सुरु झाला कि तळकोकणात वर्षासहली बहरू लागतात. आंबोली, मांगेली, विविध घाटमार्ग, नापणे, अशी ठिकाणे पर्यटकांनी फुलून जातात. वर्ष ऋतूत कोकणातला निसर्ग एका फुलून गेलेला असतो. या निसर्गाचा आस्वाद घ्यावा आणि एक दिवस मोबाईल, सोशल मीडिया पासून सर्वांसोबत पर्यटनाचा आणि खेळाचा आनंद लुटावा यासाठी पिंगुळीच्या सखे सोबती गृप आणि इतर सर्वानी एकत्र येत रांगणागड ट्रेक चे आयोजन करण्यात आले होते. सोशल मीडियावरुन करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत तब्बल ६० जणांनी जण नोंदणी केली. कोणतेही शुल्क नाही, फक्त येण्याची इच्छा हीच अट असल्याने लहानथोर,सर्व वयोगटातील मुले, तरुण-तरुणी, महिला, डॉक्टर्स, व्यावसायिक, पत्रकार, शासकीय अधिकारी, शिक्षक, लोकप्रतिनिधी असे विविध क्षेत्रातील सर्वच जण या ट्रेक मध्ये सहभागी झाले.
रविवारी पहाटे बरोब्बर ५.३० वाजता कुडाळ मधून सर्वजण रांगणागड ट्रेक साठी रवाना झाले. साडेसहा पर्यंत रांगणागड पायथ्याशी सर्वजण जमा झाले. बरेच जण एकमेकांना अपरिचित होते. पण सर्वांचे ध्येय्य एकच होते म्हणजे सर्वानी एकमेकांच्या सहकार्याने रांगणागड मोहीम फत्ते करायची. आयोजकानी सर्वाना चहा-बिस्किटे दिली. सर्वाना एनर्जी पेयांच्या बॉटल्स, पाण्याच्या बॉटल्स, केळी, लाडू अशा वस्तूंचे वाटप करण्यात आले. बरोब्बर ७ वाजता डॉ. जी. टी. राणे यांनी फ्लॅगऑफ करत ट्रेकला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी बोलताना डॉ. जी.टी. राणे यांनी सर्वाना शुभेच्छा दिल्या. आरोग्याची काळजी घ्या, फिट राहा. अशा धाडसी खेळांमध्ये सहभाग घ्या असे आवाहन डॉ. जी.टी. राणे यांनी केले.
मजल दरमजल करत, निसर्गाची विविध रूपे डोळ्यात साठवत सुमारे ५५ गिर्यारोहक रांगणागडची वाटत चढू लागले. अवघड आणि निसरड्या वाटा, उभा चढ, रिमझिम बरसणारा पाऊस, थंडगार वारा, धुके यांचा अनुभव घेत सर्वजण रांगणागडावर पोहोचले. देवी रांगणाईचे दर्शन घेतले. सखे सोबती गृप ने आणलेल्या नाश्त्याचा सर्वानी आस्वाद घेतला. त्यानंतर बाजूच्याच चिकेवटीतील श्री. लाड यांनी रांगणागडाची माहिती दिली. काही पॉईंट्स फिरवून दाखवले. जय शिवाजी जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराज कि जय, छत्रपती संभाजी महाराज कि जय, हर हर अशा घोषणांनी रांगणागड दणाणून गेला.
हि मोहीम राबविताना आयोजकांनी सर्व व्यवस्था चोख केली होती. गडावर, किंवा वाटेवर आपल्याकडून कोणताही कचरा होणार नाही याची काळजी अगदी लहान मुलांपासून सर्वच जण घेताना दिसले. गडावर गेल्यावरसुद्धा रांगणाई देवीच्या परिसरात छोटीशी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. गडावर फिरून झाल्यावर वाजण्याच्या सुमाराला सर्व गिर्यारोहक माघारी फिरले. या मोहिमेसाठी डॉ. जी. टी. राणे, अमित तेंडोलकर, राज वारंग, भूषण तेजम, शक्ती देसाई, सचिन सातार्डेकर, रुपेश तेली, दर्शन कुडव, सतीश माडये, वैभव धुरी, दीपक गावडे आणि सखे सोबती गृप यांनी सहकार्य केले.

error: Content is protected !!