कुडाळ महाविद्यालयात अभिजात अभिवाचन उत्साहात

औचित्य मराठी भाषा वर्धापन दिनाचे

दैनंदिन व्यवहारात मराठीचा जाणीवपूर्वक वापर करण्याचे आवाहन

येथील क. म. शि. प्र. मंडळाच्या संत राऊळ महाराज महाविद्यालयात अभिजात मराठी भाषा वर्धापन दिनानिमित्त ३ ऑक्टोबर रोजी अभिवाचन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. मराठी भाषेचा अभिजात वारसा, समृद्ध साहित्यपरंपरा आणि विविध साहित्यकृतींची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी, या उद्देशाने महाविद्यालयाच्या मराठी विभागातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित या उपक्रमातून मराठी भाषेचे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक महत्त्व अधोरेखित करण्यात आले. मराठी ही समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि सामाजिक जाणीवा व्यक्त करणारी भाषा असून, तिच्याविषयी विद्यार्थ्यांमध्ये अभिमानाची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने मराठी विभागप्रमुख डॉ. शरयू आसोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. यावेळी बोलताना त्यांनी मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी दैनंदिन व्यवहारात मराठी भाषेचा अभिमानाने आणि जाणीवपूर्वक वापर करावा. तसेच मराठी वाचनाची सवय जोपासून भाषेच्या संवर्धनासाठी आग्रही भूमिका घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. संतोष वालावलकर यांनी केले. कार्यक्रमातील प्रमुख आकर्षण ठरलेल्या अभिवाचन सत्रात विविध साहित्यकृतींचे प्रभावी अभिवाचन करण्यात आले. प्रा. सिद्धी परब यांच्यासह विद्यार्थी प्रतिनिधी शुभम नेरूरकर, तत्परा चौधरी, सृष्टी गोसावी, धृतिका गुरव आणि वैभवी सावंत यांनी विविध साहित्यकृतींचे अभिवाचन सादर केले. विविध साहित्यप्रकारांच्या प्रभावी सादरीकरणामुळे उपस्थितांना मराठी साहित्याच्या वैविध्यपूर्ण आणि समृद्ध स्वरूपाचा अनुभव घेता आला.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना मराठी भाषेची अभिजातता, तिची समृद्ध साहित्यपरंपरा आणि सांस्कृतिक महत्त्व यांची नव्याने जाणीव झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्नील कांदळगावकर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार महेश परब यांनी मानले. महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी आणि साहित्यप्रेमींच्या उत्स्फूर्त सहभागाने हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

error: Content is protected !!