विद्यार्थ्यांनी आप्पासाहेब पाटील यांचा आदर्श ठेवावा – ऍड. विवेक मांडकुलकर

पाट हायस्कूलमध्ये कै. स. का. तथा आप्पासाहेब पाटील जयंती उत्साहात
विद्यार्थ्यांनी आप्पासाहेब पाटील यांचे गुण आत्मसात करून उज्ज्वल करिअर घडवावे, असे आवाहन प्रसिद्ध वकील ऍड. विवेक मांडकुलकर यांनी केले. पाट हायस्कूलमध्ये कै. स. का. तथा आप्पासाहेब पाटील जयंती उत्साहात साजरी करण्यात आली, त्यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
कर्तृत्व, नेतृत्व, वक्तृत्व आणि दातृत्वाच्या माध्यमातून समाजात अमीट ठसा उमटविणारे कै. स. का. तथा आप्पासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त पाट येथील एस. एल. देसाई विद्यालय, कै. सीताबाई रामचंद्र पाटील कनिष्ठ महाविद्यालय, डॉ. विलासराव देसाई महाविद्यालय आणि कै. राधाबाई सामंत इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शुक्रवार, १४ ऑगस्ट रोजी संस्थाध्यक्ष दिगंबर सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रमुख अतिथी कुडाळ येथील प्रसिद्ध अॅडव्होकेट विवेक मांडकुलकर यांच्या उपस्थितीत हा जयंती सोहळा उत्साहात पार पडला.
यावेळी मार्गदर्शन करताना अॅड. विवेक मांडकुलकर म्हणाले, शालेय शिक्षणावरच विद्यार्थ्यांचे पुढील भवितव्य अवलंबून आहे. आई-वडिलांचा आदर करा, चांगली संगत धरा, चांगले मित्र निवडा, मानसिक आरोग्य जपा आणि आदर्श व्यक्तींकडून प्रेरणा घ्या. मन लावून अभ्यास करून उज्ज्वल करिअर घडवा आणि समाजात आदर्श व्यक्ती म्हणून नाव मिळवा.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सयाजी बोंदर यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते आप्पासाहेब पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. आप्पासाहेबांच्या जीवनचरित्रावर कु. स्पृहा नाईक हिने मराठीत, कु. कार्तिकी परब हिने हिंदीत, कु. जागृती राऊळ हिने संस्कृतमध्ये, कु. अवंतिका देसाई हिने इंग्रजीत, तर प्रा. शीला सामंत यांनी शिक्षकांच्या वतीने विचार मांडले.
संस्था अध्यक्ष दिगंबर सामंत यांच्या हस्ते अॅड. विवेक मांडकुलकर यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर विविध पारितोषिक योजनांतर्गत गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. स. का. तथा आप्पासाहेब पाटील पारितोषिकांतर्गत इयत्ता पाचवी ते दहावीतील गुणानुक्रमे प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना, प्रभाकर शंकर फणसेकर पारितोषिक योजनेंतर्गत गणित विषयातील प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना, कै. सुनिता प्रभाकर फणसेकर पारितोषिकांतर्गत मराठी विषयातील प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना तसेच कै. दशरथ कानोजी पाटकर पारितोषिकांतर्गत एस.एस.सी. परीक्षेत सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्याला पारितोषिक देण्यात आले.
सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी विद्यालयातील आदर्श विद्यार्थी म्हणून कुमार मिहीर विजय मेस्त्री, आदर्श विद्यार्थिनी म्हणून कुमारी आर्या नारायण चांदेरकर, शिक्षणेतर उपक्रमातील प्रथम क्रमांकाचा विद्यार्थी कुमार सुयश सूर्यकांत पाटकर आणि विद्यार्थिनी कुमारी धनदा वैभव सावंत यांचा गौरव करण्यात आला. तसेच इयत्ता सातवीतील शिष्यवृत्तीधारक कुमार भार्गव पेडणेकर, कुमारी भक्ती तेली कोचरेकर, कुमार विघ्नेश सावंत आणि कुमारी हर्षदा जोशी यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. पारितोषिकांचे वाचन शिक्षिका सौ. नंदिनी बुरुड यांनी केले.
संस्था सचिव विजय ठाकूर म्हणाले, पाटील साहेबांसारख्या देवमाणसाने संस्थेसाठी दिलेले योगदान अमूल्य आहे. १९५७ पासून अनेकांनी ही संस्था मोठी करण्यासाठी प्रयत्न केले. राजकीय पार्श्वभूमी नसतानाही आपल्या अलौकिक व्यक्तिमत्त्वाने आप्पासाहेबांनी राजकारणात ठसा उमटविला. विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घेऊन प्रगती करावी आणि यश संपादन करावे.
अध्यक्षीय भाषणात दिगंबर सामंत यांनी विद्यार्थ्यांनी आप्पासाहेब पाटील यांचे गुण आत्मसात करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, आप्पासाहेब सामान्य शेतकरी कुटुंबातून आले. गावात सुविधा आणि साधने नसतानाही दुर्लक्षित भागातून पुढे येत त्यांनी अलौकिक व्यक्तिमत्त्व घडविले. सामान्य शेतकऱ्याचा मुलगा केंद्रीय मंत्रिमंडळापर्यंत पोहोचून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवतो, ही अभिमानाची बाब आहे. आप्पासाहेबांबद्दल गुजराती समाजातही नितांत आदर आहे.
यावेळी संस्था सदस्य राजेश सामंत, महेश ठाकूर, बाबा तळावडेकर, अवधूत रेगे, जिल्हा परिषद सदस्या तथा विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ. यज्ञा साळगांवकर, सीनियर कॉलेजच्या प्राचार्या सौ. साळसकर, इंग्लिश मीडियमचे मुख्याध्यापक तुषार आंबेरकर, शिक्षक प्रतिनिधी संदीप साळसकर, शिक्षकेतर कर्मचारी प्रतिनिधी विलास म्हापणकर, ज्येष्ठ शिक्षिका सौ. दीपिका सामंत, प्रा. विजय मेस्त्री, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पूर्वा नाईक यांनी केले, तर आभार पर्यवेक्षिका सौ. अंकिता मोडक यांनी मानले.






