कणकवलीत ‘उत्तरचंद्राची कोजागिरी’ अभिवाचन अनुभव कार्यक्रम उत्साहात.

कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातल्या हळवल येथे आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल निर्मित आणि प्रस्तुत अभिवाचन अनुभव कार्यक्रम ‘उत्तरचंद्राची कोजागिरी’ चा प्रयोग उत्साहात सादर झाला. हळवलच्या निलायम कृष्णकक्ष येथे रविवारी ०४ ऑक्टोबर २०२६ रोजी सादर करण्यात आलेल्या ह्या प्रयोगाला कणकवलीतील विविध क्षेत्रातील मान्यवर रसिकांची उपस्थिती होती. आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या वतीने सहसंपादक सानिका वायंगणकर यांनी उपस्थित मान्यवर श्रोत्यांचे स्वागत केले.

या कार्यक्रमाची संकल्पना व संहिता लेखन ज्येष्ठ लेखिका वैशाली पंडित यांची असून या कार्यक्रमात आजी – वैशाली पंडित, आजोबा – संजय शिंदे, सूत्रधार – अक्षय सातार्डेकर, सहकलाकार – डॉ. सुमेधा नाईक, तालवाद्य – वैभव मांजरेकर आणि संगीत संयोजन – विरेश वळंजू या कलाकारांचा सहभाग होता. अभिवाचन, संवाद, संगीत आणि तालवाद्याच्या साथीने सादर झालेल्या या कार्यक्रमातून, अत्यंत दर्जेदार आणि अनोखे सादरीकरण त्यातल्या विषयातील मार्मिकतेसह अनुभवायची रसिकांना मिळाली अशी प्रतिक्रिया रसिकांनी व्यक्त केली. सुप्रसिद्ध अभिनेते अभय खडपकर, सुप्रसिद्ध कवी प्रसाद कुलकर्णी, लेखक महेश काणेकर, निमंत्रक स्वर्गानंद ट्रॅव्हल्सच्या वतीने गीता कामत व डाॅ. वैशाली कोरगावकर, संपदा प्रभुदेसाई यांच्यासह उपस्थितांनी या कार्यक्रमाची विशेष प्रशंसा करत अभिवाचनाच्या माध्यमातून कथानुभव अधिक प्रभावीपणे रसिकांपर्यंत पोहोचविण्याचा हा अभिनव प्रयोग असल्याचे उपस्थितांनी नमूद केले. हा प्रयोग लवकरच संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यासह महाराष्ट्र तसेच देश विदेशात पोहोचावा अशा सदिच्छा विविध मान्यवरांसह रसिकांनी दिल्या.

यावेळी निमंत्रक स्वर्गानंद टूर्स ॲन्ड ट्रॅव्हलच्या गीता कामत व डॉ. वैशाली कोरगावकर, त्रिंबक आजगावकर, देवयानी आजगावकर, दिनेश गोगटे, मेघा गोगटे, महेश सावंत, यांच्यासह रसिक श्रोते उपस्थित होते. आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या वतीने ह्या कार्यक्रमासाठी निलायम कृष्णकक्षचे वामन पंडित व ज्योती पंडित यांच्यासह ध्वनीसंयोजक श्री. डंबे व सहकारी यांच्या सहकार्याबद्दल आभार मानण्यात आले.

आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलचे विशेष सांस्कृतिक समन्वयक त्रिंबक आजगांवकर व सौ. देवयानी आजगांवकर यांनी उत्तरचंद्राची कोजागिरी कार्यक्रमाच्या आगामी तारखांची आणि ठिकाणांची माहिती दिली. मालवणच्या दत्त मंदिर भरड येथे दिनांक ७ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६. ३० आणि वेंगुर्ले येथील बॅरिस्टर नाथ पै संकुल येथे ११ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता उत्तरचंद्राची कोजागिरीचा संपूर्ण संच आगामी प्रयोगांना सज्ज असल्याचेही आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलचे विशेष सांस्कृतिक समन्वयक त्रिंबक आजगांवकर व सौ. देवयानी आजगांवकर यांनी सांगितले.

error: Content is protected !!