“दहा वर्षांचा कचरा आता नकोच!”

सांगिर्डेवाडी ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा
आजपासून डम्पिंगला पूर्णविराम
कुडाळ नगरपंचायत क्षेत्रातील सांगिर्डेवाडी येथील कचरा डम्पिंगचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, डम्पिंग ग्राऊंडवर नवीन कचरा टाकण्यास ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. गेल्या सुमारे दहा वर्षांपासून या ठिकाणी उघड्यावर कचरा टाकला जात असल्याने परिसरात दुर्गंधी, अस्वच्छता तसेच कावळे, कुत्रे आणि बगळ्यांचा उपद्रव वाढला आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, कुडाळच्या प्रतिमेलाही यामुळे बाधा येत असल्याची नाराजी ग्रामस्थांनी व्यक्त केली.
या पार्श्वभूमीवर सांगिर्डेवाडीतील संतप्त नागरिकांनी कुडाळ नगरपंचायतीचे मुख्याधिकारी खंडू पवळ यांची भेट घेऊन डम्पिंगच्या समस्येबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
यावेळी मुख्याधिकारी पवळ यांनी नगरपंचायतीकडून सुरू असलेल्या आणि प्रस्तावित उपाययोजनांची माहिती दिली. एमआयडीसी परिसरात घनकचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी जागा नियोजित करण्यात आली असून, हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्यासाठी काही कालावधी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. चिकन वेस्ट संकलनासाठी बेळगाव येथील कंपनीशी करार करण्यात आला असून, कुडाळ व सावंतवाडी येथील चिकन वेस्ट एकत्रितपणे उचलण्यात येणार आहे. मच्छी वेस्ट ‘आकाश फिश मिल’कडून स्वीकारण्यात येणार आहे.
ओला कचरा वाळवून त्यावर प्रक्रिया करून खतनिर्मिती करण्यात येणार असून, सॅनिटरी वेस्टच्या प्रक्रियेसाठी महिनाभरात मशीन उपलब्ध होईल, अशी माहितीही त्यांनी दिली. कचऱ्याचे पाच ते सहा प्रकारांत विलगीकरण करून त्यावर स्वतंत्र प्रक्रिया करण्याचा प्रयत्न असून, या माध्यमातून कचऱ्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यात येईल. हा संपूर्ण प्रकल्प कार्यान्वित होईपर्यंत नागरिकांनी दोन महिन्यांचा अवधी द्यावा, अशी विनंती पवळ यांनी केली. तसेच उघड्यावर कचरा टाकणे योग्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मात्र, मुख्याधिकाऱ्यांची ही विनंती ग्रामस्थांनी फेटाळून लावली. यापूर्वीही प्रशासनाकडून अनेकदा मुदत मागण्यात आली; मात्र प्रश्न सुटला नसल्याने आता आणखी वेळ देणार नसल्याची ठाम भूमिका नागरिकांनी घेतली. आजपासून सांगिर्डेवाडी येथे एक दिवसही नवीन कचरा टाकू दिला जाणार नाही, असा इशारा ग्रामस्थांनी दिला.
दरम्यान, सध्या उघड्यावर पडलेला कचरा उचलून परिसर पूर्णपणे स्वच्छ करण्यासाठी नगरपंचायतीला एक ते दीड महिन्याचा अवधी देण्यात येईल; मात्र या काळात नवीन कचरा टाकण्यास पूर्णपणे बंदी राहील, असे ग्रामस्थांनी स्पष्ट केले. नियम मोडून कचरा टाकण्याचा प्रयत्न झाल्यास संबंधितांवर थेट गुन्हा दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
चर्चेदरम्यान नगरसेवक निलेश परब यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यकाळाबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यावर मुख्याधिकारी खंडू पवळ यांनी, “माझा कार्यकाळ दोन महिन्यांचा असेल, तर हा कचऱ्याचा प्रश्न पूर्णपणे मार्गी लावूनच मी येथून जाईन,” असा विश्वास व्यक्त केला.
धीरज परब यांनीही मुख्याधिकाऱ्यांनी शहरातील विकासकामांमध्ये दाखविलेल्या धडाक्याप्रमाणेच कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या कामातही तत्परता दाखवावी, अशी मागणी केली. हा प्रकल्प लवकर पूर्ण झाल्यास नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांचा सत्कार करू, असे त्यांनी सांगितले. तसेच सांगिर्डेवाडीतील डम्पिंगची जागा अधिकृत आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, ग्रामस्थांनी कुडाळ पोलीस निरीक्षकांची भेट घेऊन नगरपंचायतीला सांगिर्डेवाडी येथे कचरा टाकण्यासाठी पोलीस संरक्षण देऊ नये, अशी मागणी करणारे निवेदन सादर केले.
यावेळी नगरसेवक निलेश परब, अमित सामंत, अभय शिरसाट, धीरज परब, के. बी. परब, अमित राणे, भूषण राणे यांच्यासह सांगिर्डेवाडीतील ग्रामस्थ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






