विद्यार्थ्यांच्या मनावर जलसंधारणाचे महत्त्व बिंबवित, पाण्याचा प्रत्येक थेंब जपण्याचे संस्कार

साकेडी येथे स्नेहसिंधु कृषी पदवीधर संघाच्या वनराई बंधारा उपक्रमात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे श्रमदान

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर वनराई बंधारा बांधत असताना विद्यार्थ्याची देखील साधला संवाद

महिलांशी संवाद साधताना पाणी बचती बाबत केले आवाहन

पाण्याचे महत्त्व केवळ पुस्तकातून शिकण्यापेक्षा ते प्रत्यक्ष कृतीतून समजून घेणे अधिक प्रभावी ठरते. याच उद्देशाने कणकवली तालुक्यातील साकेडी येथे स्नेहसिंधु कृषी पदवीधर संघाच्यावतीने 2 ठिकाणी वनराई बंधारे उभारण्यात आले. साकेडी शाळा क्रमांक १ मधील विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे श्रमदान करत जलसंधारणाच्या कामात सहभाग घेतला. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून पाणी अडविणे, पाणी जिरविणे आणि जलस्रोतांचे संवर्धन याबाबत मार्गदर्शन केले.

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार साकेडी येथे स्नेहसिंधु कृषी पदवीधर यांच्यावतीने वनराई बंधारे बांधण्याचे काम गतीने सुरू आहे. या श्रमदानात उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, गट विकास अधिकारी अरुण चव्हाण, तालुका कृषी अधिकारी प्रवीण ओहोळ, स्नेहसिंधू कृषी पदवीधर संघाचे अध्यक्ष हेमंत सावंत , संदीप राणे ,पंकज दळी, ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके , सरपंच सुरेश साटम , उपसरपंच प्रज्वल वर्दम, ग्रा.प.सदस्य दिगंबर वालावलकर , सुचिता गुरव, प्रेरणा जाधव,विशाखा राणे,जेऊर शेख, ग्रामसेवक रेश्मा माळकर, मंडळ अधिकारी योजना सापळे, तलाठी किशोर चौगुले, तलाठी श्री. ढाके, मुख्याध्यापक प्रभाकर पावसकर,शिक्षक उमेश मोरये, तंटामुक्त कमिटी अध्यक्ष मुरारी राणे , नागेश माईणकर यांच्यासह ग्रामस्थ, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी उत्साहाने श्रमदान करत वनराई बंधारा उभारणीच्या कामात सहभाग घेतला.

वनराई बंधारा उभारणीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्व आणि जलसंधारणाची गरज प्रत्यक्ष अनुभवातून समजली. भविष्यातील पिढीने पाण्याचा वापर जपून करावा, पावसाचे पाणी वाया जाऊ न देता त्याचे संधारण करावे आणि गावातील जलस्रोतांचे संरक्षण करण्याची जबाबदारी स्वीकारावी, याबाबत यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. श्रमदानातून विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकीचे संस्कार रुजविण्याचा संदेश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिला.
यावेळी स्नेहसिंधु कृषी पदवीधर संघाच्यावतीने बांधण्यात आलेल्या वनराई बंधाऱ्याबाबत माहिती घेतली. तसेच या साकेडी येथील ओहोळावर जलस्त्रोताबाबत माहिती घेवून पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.

error: Content is protected !!