हिंदी वक्तृत्व स्पर्धेत प्रांजल तेरसे, सानिया घाडी व दुर्वा बांदेकर प्रथम

टोपीवाला वाचनालयात स्पर्धेचे आयोजन

रा. ब. अनंत शिवाजी देसाई वाचनालय (जिल्हा ग्रंथालय), कुडाळ यांच्या वतीने कै. सौ. गंगाबाई पांडुरंग जोशी स्मृती हिंदी भाषा वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन वाचनालयाच्या सभागृहात करण्यात आले. श्री. रा. पां. जोशी, वेंगुर्ले यांनी आपल्या मातोश्रींच्या स्मरणार्थ दिलेल्या ५० हजार रुपयांच्या देणगीच्या व्याजातून ही स्पर्धा आयोजित केली जाते.
या वर्षीची स्पर्धा तीन गटांत घेण्यात आली. त्यामध्ये एकूण २३ स्पर्धकांनी सहभाग घेतला. इयत्ता ५ वी ते ७ वी या कुडाळ तालुकास्तरीय गटात प्रांजल सतीश तेरसे (कुडाळ हायस्कूल) हिने प्रथम, ईश्वरी गणेश साळुंके (कुडाळ हायस्कूल) हिने द्वितीय, तर अंकिता प्रकाश शास्त्री (कन्याशाळा, कुडाळ) हिने तृतीय क्रमांक मिळविला.
इयत्ता ८ वी ते १० वी गटात सानिया श्रीपाद घाडी (कुडाळ हायस्कूल) हिने प्रथम, चिन्मयी संतोष पिंगुळकर (कुडाळ हायस्कूल) हिने द्वितीय, तर ओराईन ना. पंडित (नाथ पै विद्यालय, कुडाळ) हिने तृतीय क्रमांक पटकावला.
सर्वांसाठी खुल्या गटात दुर्वा दर्शन बांदेकर (कुडाळ) हिने प्रथम, रिया नितीन मयेकर (ना. अ. दे. टोपीवाला ज्युनिअर कॉलेज, मालवण) हिने द्वितीय, तर धनश्री प्रसाद मिठबांवकर (ना. अ. दे. टोपीवाला ज्युनिअर कॉलेज, मालवण) हिने तृतीय क्रमांक मिळविला. सुखी श्रीकृष्ण सामंत (कुडाळ हायस्कूल) हिला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
स्पर्धेसाठी प्रा. श्री. एस. टी. आवटी, श्री. सनी बा. चव्हाण, श्री. सतीश तेरसे आणि श्री. विजय नाईक यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
स्पर्धेचे उद्घाटन वाचनालयाचे सहकार्यवाह भार्गवराम धुरी यांच्या हस्ते कै. सौ. गंगाबाई पांडुरंग जोशी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आले. तर बक्षीस वितरण ग्रंथमित्र अनंत वैद्य यांच्या हस्ते झाले. यावेळी वाचनालयाचे सदस्य अनंत वैद्य, ग्रंथपाल राजन पांचाळ तसेच कर्मचारी उपस्थित होते.
विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिके व प्रशस्तिपत्रके देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना हिंदी भाषेत प्रभावी वक्तृत्व सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले.

error: Content is protected !!