पिंगुळीत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसेंचे श्रमदान

जलसंधारणासाठी लोकसहभागाची चळवळ
चार दिवसांत जिल्ह्यात ८०० हून अधिक वनराई बंधारे
गेल्या ३५ ते ४० वर्षांच्या कालावधीतील यंदाचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाऊस सर्वात निचांकी ठरला आहे. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली असून, राज्य शासनाने जिल्ह्यात दुष्काळाचा ‘ट्रिगर वन’ लागू केला आहे. या पार्श्वभूमीवर वाहून जाणारे पाणी वनराई बंधाऱ्यांद्वारे अडवून ते जमिनीत जिरविणे, तसेच विहिरी व तलावांची पाणीपातळी वाढविणे हा पुढील ७ ते ८ महिन्यांसाठी पाणी टिकवून ठेवण्याचा कमी खर्चाचा आणि प्रभावी उपाय आहे, असे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सांगितले.
कुडाळ तालुक्यातील पिंगुळी ग्रामपंचायत हद्दीतील राऊळवाडी येथे वनराई बंधारा उभारण्यासाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी स्वतः श्रमदान केले. यावेळी त्या बोलत होत्या. जिल्ह्यात लोकसहभागातून १० हजार वनराई बंधारे उभारण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, या मोहिमेला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. अवघ्या चार दिवसांत जिल्ह्यात ८०० हून अधिक बंधारे उभारण्यात आले आहेत.
या उपक्रमामुळे जलसंधारणाच्या कामांचे महत्त्व नागरिकांच्या लक्षात आले असून, लोकसहभागातून ही चळवळ व्यापक होत आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. शाळा, महाविद्यालये, विविध शासकीय संस्था, अधिकारी-कर्मचारी तसेच विद्यार्थीही या उपक्रमात सहभागी होत आहेत.
वनराई बंधारे कमी खर्चात पाणी अडविण्याचा प्रभावी पर्याय असल्याचे सांगताना जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी बंधाऱ्यांच्या उभारणीत तांत्रिक बाबींची काळजी घेण्याचे आवाहन केले. कच्चे बंधारे अतिवृष्टीमध्ये टिकून राहतीलच असे नाही. त्यामुळे योग्य जागेची निवड, आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन आणि बंधाऱ्यावर योग्य आच्छादन करणे महत्त्वाचे आहे. पाणी अडवून ते अधिकाधिक काळ जमिनीत मुरविणे हा या बंधाऱ्यांचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पक्क्या बंधाऱ्यांमध्ये साचलेल्या गाळाचा प्रश्नही महत्त्वाचा असून, अशा बंधाऱ्यांच्या दुरुस्तीबरोबरच गाळ काढण्याच्या परवानगीबाबत जलसंधारण विभागाशी चर्चा करण्यात आली आहे. याबाबत जिल्हा पातळीवर आवश्यक निर्णय घेता येतील का, याचीही तपासणी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात लोकसहभागातून सुरू असलेल्या जलसंधारणाच्या या मोहिमेची इतर जिल्ह्यांकडूनही दखल घेतली जात आहे. वरिष्ठ पातळीवरूनही या उपक्रमाचे कौतुक होत असून, नागरिकांचा वाढता सहभाग ही या मोहिमेची मोठी ताकद ठरत आहे, असे जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी नमूद केले.
यावेळी उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळूशे, तहसीलदार सचिन पाटील, जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर, पंचायत समिती सदस्य ममता राऊळ, सरपंच अजय आकेरकर, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी भास्कर चौगुले, मंडळ कृषी अधिकारी विजय घोंगे, गायत्री तेली, सहायक कृषी अधिकारी सविता हरमलकर, नायब तहसीलदार अमरसिंह जाधव, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष उमेश तोरसकर, कुडाळ तालुका अध्यक्ष विजय पालकर, पत्रकार प्रमोद म्हाडगुत, रोहन नाईक, संजय तेंडोलकर, निलेश ओरोसकर, प्रसाद राणे, एसआरएम कॉलेजचे विद्यार्थी-शिक्षक, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी तसेच पिंगुळी ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.






