कुडाळात घराच्या खोलीला आग ; मोठे नुकसान

नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांची नाईक कुटुंबियांना मदत
शहरातील केळबाईवाडी नजिकच्या वाघसावंत टेंब येथील श्री भवानी मंदिरासमोरील श्री. सामंत यांच्या घराच्या माडीवरील खोलीला सायंकाळी साडेपाचच्या सुमाराला अचानक आग लागून खोलीसह भाडेकरू श्री. नाईक कुटुंबाचे संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. दरम्यान नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन नाईक परिवाराला धीर देऊन मदतीचा हात दिला.
या आगीत कपडे, धान्य, इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह जीवनावश्यक साहित्य आगीत खाक झाले असून मोठे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
आगीची माहिती मिळताच नागरिकांनी कुडाळ नगरपंचायत व एमआयडीसीच्या अग्निशमन दलाच्या दोन गाड्या पाचारण केल्या. पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्यात आली. खोलीतील गॅस सिलिंडर वेळेत बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेत लगतच्या खोलीलाही झळ बसली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्यात सहभाग घेतला.
दरम्यान कुडाळच्या नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर यांनी नगरसेवक गणेश भोगटे, नयना मांजरेकर, वरू राणे ,अप्पू राणे यांच्यासह घटनास्थळी धाव घेऊन नाईक कुटुंबीयांना धीर दिला तसेच मदत सुद्धा केली.




