कुडाळ पं.स. सभेत घरकुलांसह अनेक मुद्दे चर्चेत

घरकुल दुरुस्ती कामांना मंजुरी नाही, शाळा नादुरुस्त असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका, पकडलेल्या बिबटयांना वस्तीनजीकच्या जंगलात सोडले जाणे, मीटर नसतानाही ग्राहकाला वीज बिलाचा शॉक अशा अनेक प्रश्नांनी सोमवारी झालेली कुडाळ तालुका पंचायत समितीची मासिक सभा गाजली. तालुक्यातील अनेक प्रश्नांकडे पंचायत समिती सदस्यांनी लक्ष वेधत चिंता व्यक्त केली.
     कुडाळ पंचायत समितीची सभा सोमवारी धर्मवीर छत्रपती सभाजीराजे सभागृहात सभापती मिलिंद नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपसभापती सीताराम तेली, गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांच्यासह सभागृहात पचायत समिती सदस्य, खातेप्रमुख व अधिकारी उपस्थित होते
सुरुवातीला गेल्या सभेतील सूचना व पूर्तता यांचा आढावा घेण्यात आला. मागण्या बाबतचे प्रस्ताव संबंधित विभागाकडे पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले. यावेळी संबंधित खाते प्रमुख, प्रतिनिधी यांनी काही प्रश्नाची उत्तर दिली. काही खाते प्रमुख उपस्थित नसल्याने सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. आम्ही सभेत लोकांचे प्रश्न मांडायचे आणि जर अधिकारीच उपस्थित नसतील, तर पाठपुरावा कोणाकडे करायचा ? असा सवाल करण्यात आला. सभेत मंगेश प्रभू, अमित भोगले, संतोष कांदळकर, योगेश धुरी, बाळकृष्ण मडव, अर्चना घावनळकर, नितीन महाडेश्वर, अश्वीनी सावंत, अर्चना बंगे या सदस्यांनी प्रश्न उपस्थित करून चर्चेत सहभाग घेतला.
    जांभवडे येथील राजेंद्र कृष्णा कदम यांच्या घरी महावितरणचा वीज मीटर नसताना तरीसुद्धा त्यांना दोन हजार रुपये बील कसे आले? असा सवाल बाळकृष्ण. मडव यांनी उपस्थित केला. माणगाव दत्त मंदिर ते माणगांव चर्च रस्ता दुतर्फा  पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचते, याकडे बांधकाम विभागाचे वारंवार लक्ष वेधले. मागील सभेत प्रश्न उपस्थित केला. मात्र कोणीच अधिकारी पाहणी करायला आले नाहीत. तसेच कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही. अशीच स्थिती राहिली तर येत्या पावसात या भागात मोठी अडचण  होणार आहे याकडे योगेश धुरी यांनी लक्ष वेधले. सभापती मिलिंद नाईक यांनी संबंधित यंत्रणेच्या  अधिकाऱ्यांना भेट देण्याबाबत सूचना दिल्या.
पीएमकिसान योजनेच्या लाभासाठी सन २०११ पूर्वी आधारकार्ड नसल्याने त्या कालावधीतले आधार कार्ड मिळण्यास अडचण निर्माण होत आहेत याकडे बाळकृष्ण मडव यांनी लक्ष वेधले. यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी श्री चौगुले यांनी पीएम सार्वजनिकसाठी आता आधार कार्ड ऑपशन काढून टाकण्याबाबत कार्यवाही सुरू असल्याचे सांगत आता ती अडचण येणार नाही असे स्पष्ट केले. गोपीनाथ मुंडे अपघात योजनेचे प्रस्ताव १ जानेवारी महाडीबीटी पोर्टल वरून ऑनलाईन भरणे बंधनकारक करण्यात आले आहे. आत्तापर्यंत कुडाळ तालुक्यात १२ प्रस्ताव पेंडिंग होते ते मंजूर झालेले आहेत. दरम्यान गोपीनाथ मुंडे अपघात योजनेसाठी अपघातानंतर तीन दिवसात अर्ज करावा, या योजनेत मृत शेतकऱ्यांचा नातेवाईकांना लाभ मिळू शकतो अशी माहिती देण्यात आली.
तेंडोली गावात गवारड्यांच्या उपद्रवामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. दुसरीकडे वन माकडांचाही उपद्रव वाढला आहे याकडे सदस्य मंगेश प्रभू यांनी लक्ष वेधले. गवा रेड्याच्या नुकसानीचे पंचनामे वनविभागा कडून सुरू आहेत असे श्री सावत यांनी सांगितले. तसेच आतापर्यंत उपद्रव देणाऱ्या ३ हजार ५०० माकडांना कुडाळ तालुक्यातून पकडून दाजीपूर येथील अभयारण्यात सोडले असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी उपसभापती सिताराम तेली यांनी वन्य प्राण्यांच्या नुकसानीमुळे आपला शेतकरी त्रस्त झाला आहे ८-१० वर्षांपूर्वी आमची जनावरे जर वनविभागाच्या एरियात गेली तर शेतकऱ्यांवर केस केली जात होती. मग आता आम्ही काय करायचं? ही कुणाची मालमत्ता आहे ?असा सवाल वन अधिकाऱ्याला केला. यावेळी वनाधिकाऱ्यांनी ही तर राष्ट्रीय संपत्ती असल्याचे सांगितले.
बिबट्याच्या . दहशती कडे लक्ष वेधताना मंगेश प्रभू म्हणले, गेल्या चार वर्षात तेंडोलीत तीन वेळा बिबट्या पकडण्यात आले. पण ते बिबटे सोडतात कुठे? असा आम्हाला प्रश्न आहे. आमच्या माहितीनुसार ते बिबटे वनविभाग दाजीपूरला सोडत नाहीत तर जवळच्या वालावलच्या जंगलात सोडतात असा संशय व्यक्त केला. हे वालावल जंगल आमच्या गावापासून तीन ते चार कि.मी अंतरावर आहे, असे सांगत वनविभागा च्या कारभाराचा पोलखोल केला . मात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाते असे वनविभागाने स्पष्ट केले.
सन २०२४ मध्ये हिर्लोक गावातील घरदुरुस्तीचे प्रस्ताव ग्रामपंचायतकडे दिले आहेत. मात्र ते प्रस्ताव पंचायतसमितीकडे  का मिळत नाहीत ? असा सवाल सदस्य अश्विनी सावंत यांनी केला. याबाबत. तपासणी करून कार्यवाही करा असे आदेश सभापती श्री नाईक यांनी दिले. हुमरमळा (वालावल ) गावातील घरकुलांची ड यादीच गहाळ झाली आहे. याकडे अर्चना बंगे यांनी लक्ष वेधत या प्रश्नात आम्ही उपोषण सुद्धा केले, मात्र अद्याप कोणतीच कार्यवाही झाली नाही. त्यामुळे हुमरमळा गावातील २७ सर्वसामान्य लोक घरकुलपासून वंचित राहिले आहेत, याकडे लक्ष वेधले. तसेच वालावल कवठी चेंदवण येथील मातीची घरे कोसळण्याच्या स्थितीत आली आहेत त्यांनाही मंजुरी मिळाली नसल्याचे  सांगत अर्चना बंगे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.
कुडाळ तालुक्यात नवीन ४५०० ची यादी मंजूर होणार आहे. त्यात या लोकांची नावे असतील असे विस्तार अधिकारी श्री. ओरोसकर यांनी सांगितले. अमित भोगले योगेश धुरी यांनीही घरकुलाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले. काही लोकांची घरे पडायला आली आहेत. आराखड्यात त्यांची नावे आहेत. लाभार्थीने घर पडणार म्हणून बांधले तर निधी मिळणार नाही. पंचायत समिती किवा ग्रामपंचायत त्यांची काय सोय करणार, असे श्री धुरी यांनी विचारले असता यावेळी उपसभापती सिताराम तेली यांनी तात्काळ घर उपलब्ध करून देण्यासाठी निधीची तरतूद नाही. सामाजिक सेवा म्हणून आपल्याच खिशात हात घालून मदत करावी लागते असे सदस्यांना सांगून वेळ मारून नेली .
ओरोस मध्ये अनेक नवीन कॉम्प्लेक्सचे सांडपाणी  गटर मधून नाल्यात सोडले जात आहे याकडे अमित भोगले यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. संबंधीताना आरोग्य विभागाने नोटीसा द्यान्यात असे सूचित केले. कुंदे आब्रड गावात कुडाळ आगाराची एकही एसटी बस येत नाही, परिणामी विद्यार्थी व नागरीकाची गैरसोय होत आहे, याकडे नितीन म्हाडेश्वर यांनी लक्ष वेधले.
केंद्रशाळा माणगाव नंबर 2 इमारतीचे छप्पर मोडकळीस आले याबाबत गेले तीन वर्ष प्रस्ताव देत आहे. मात्र त्यासाठी निधीची उपलब्धता नाही. येत्या पावसाळ्यात काही धोका निर्माण झाल्यास मुलांची जबाबदारी कोण घेईल? असा सवाल योगेश धुरी यांनी उपस्थित केला. यावेळी सभापती मिलिंद नाईक यांनी निधीच्या उपलब्धतेनुसार शाळांचे दुरुस्तीचा प्रस्ताव घेतले जातात असे सांगितले. तर मुलांच्या सुरक्षिततेची जबाबदारी महत्वाची असल्याचे श्री धुरी यांनी सांगत उत्तरा बाबत असमाधान व्यक्त केले.
सभेत योगेश धुरी यांनी कुडाळ पं.स. कोणत्या विभागाचा रोलर भंगारात विकला गेला आहे काय, असा सवाल केला. संबंधीत बांधकामच्या अधिकाऱ्याने रोलर निर्लेखित करण्यात आला होता, लिलाव करण्यात आल्याचे सागितले. याबाबत माहिती विचारत सर्व माहिती मिळावी अशी मागणी श्री.धुरी यांनी केली. यावेळी सभापती श्री. नाईक यांनी आपपास माहिती मिळेल असे सांगत चर्चेला पूर्णविराम दिला.
घावनळे गांवातील सर्व अंगणवाडी इमारती दुरुस्तीला आल्या आहेत याकडे अर्चना घावनळकर यांनी लक्ष वेधत कौले पडत असून मुलांना दुखापत होण्याची भीती व्यक्त केली. परीसरात माकड मोठ्या प्रमाणात असून मुलांच्या वह्या, पुस्तके नेतात असे सांगून माकड पकड मोहिम राबविण्याची मागणी केली. तेंडोली, वाडीवरवडे शाळा निर्लैखित करण्याबाबत मंगेश प्रभू यांनी प्रश्न उपस्थित करून प्रशासनाच्या हलगर्जीपणाबाबत नाराजी व्यक्त केली. माड्याचीवाडी येथील पोलीस चेकपोस्ट ईमारतीच्या बांधकामाबांबत पुढे काय झाले याकडे लक्षवेधीत कार्यवाहीची मागणी केली. या सभेत एसटी विभाग, कृषी, पशुसंवर्धन, शिक्षण, लघुपाटबंधारे, महावितरण आधी विभागाच्या विषयांवर चर्चा झाली.

error: Content is protected !!