शाळांमधून वह्या-पुस्तके खरेदीच्या सक्तीला ब्रेक !

जि.प. शिक्षण विभागाचा सर्व शाळांना आदेश
जि.प. सदस्य रुपेश पावसकर यांनी वेधले होते लक्ष
शाळांनी विद्यार्थी आणि पालकांना विशिष्ट दुकानातूनच वह्या, पुस्तके व इतर स्टेशनरी खरेदी करण्याची सक्ती करू नये, असा महत्त्वाचा आदेश जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या शिक्षण विभागाने काढला आहे. याबाबत नेरुर देऊळवाडाचे जि.प. सदस्य रुपेश अशोक पावसकर यांनी शासकीय व खासगी शाळांमधून होणाऱ्या बेकायदेशीर विक्रीबाबत तक्रार करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यांच्या पत्राची दखल घेत शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी पत्र काढून शाळांमधील वह्या-पुस्तकांची सक्तीला आळा घातला आहे.
नेरुर देऊळवाडाचे जि.प. सदस्य रुपेश अशोक पावसकर यांनी शासकीय व खासगी शाळांमधून होणाऱ्या बेकायदेशीर विक्रीबाबत तक्रार करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यावर शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी जा.क्र. सिजिप/शिक्षण/माध्य/आस्था-2/1382/2026 दि. 21/07/2026 रोजी या संदर्भाने सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना पत्र काढले आहे. शाळांनी कोणत्याही विद्यार्थ्यांना व पालकांना एकाच दुकानातून साहित्य खरेदी करण्याची सक्ती करता येणार नाही. शाळेच्या आवारात वह्या, पुस्तके व इतर स्टेशनरीची विक्री करण्यास पूर्णतः मनाई असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर कारवाई होणार, असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. हा निर्णय विद्यार्थी आणि पालकांवरील आर्थिक बोजा कमी करण्यासाठी घेण्यात आला असल्याचेही शिक्षण विभागाने म्हटल्याचे रुपेश पावसकर यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हजारो पालकांना या धाडसी निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे. या धाडसी निर्णयामुळे नेरूर देऊळवाडा जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांचे जिल्हाभरातील पालकांनी कौतुक करून आभा मानले आहेत.






