मराठी शाळांच्या संवर्धनासाठी एकत्र येण्याची गरज : डॉ. दीपक पवार

कुडाळ येथे महाराष्ट्रधर्म शिबिर
मराठी शिक्षण, भाषा आणि कोकणच्या भवितव्यावर सखोल मंथन
मराठी शाळा आपण टिकवल्या नाहीत तर मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि मराठी माणूस यांपैकी काहीही वाचणार नाही. त्यामुळे जात-धर्माचे भेद विसरून मराठी शाळांच्या संवर्धनासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे, असे आवाहन मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार यांनी केले.
मराठी अभ्यास केंद्राच्या वतीने कुडाळ येथील मराठा समाज सभागृहात रविवारी सायंकाळी आयोजित ‘महाराष्ट्रधर्म शिबिरा’त ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. या शिबिराला विविध क्षेत्रांतील मराठीप्रेमी मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.
डॉ. पवार म्हणाले, कोकणात मराठी शाळांसमोरील संकट जितके गंभीर आहे, तितकाच स्थलांतराचाही प्रश्न महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र टिकवायचा असेल तर प्रथम कोकण टिकला पाहिजे. बाहेरून आलेले लोक कोकणाचे जतन करणार नाहीत; उलट येथील साधनसंपत्तीची लूट होण्याची भीती आहे. त्यामुळे हिंदू-मुस्लिम या छद्म संघर्षातून बाहेर पडून महाराष्ट्रधर्मासाठी एकत्रितपणे काम करण्याची वेळ आली आहे.
शिबिरातील दुसरे वक्ते डॉ. प्रकाश परब यांनी ‘भाषा आणि धर्म’ या विषयावर तात्त्विक मांडणी केली. ते म्हणाले, भारत हा धर्मनिरपेक्ष देश असला तरी भाषानिरपेक्ष नाही. भाषावार राज्यांची निर्मिती झाल्याने धर्मापेक्षा भाषा हीच आपली प्राथमिक ओळख आहे. श्रद्धा हा धर्माचा आधार आहे, तर ज्ञान हा भाषेचा पाया आहे. धर्म हा स्थितिशील आणि आदेशात्मक असतो, तर भाषा परिवर्तनशील आणि लोकशाहीवादी असते.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, समाजात धर्मसंस्थांपेक्षा भाषा आणि ज्ञानवृद्धी करणाऱ्या संस्था अधिक बळकट झाल्या तरच समाजाची खरी प्रगती होईल. कोकणाला बाळशास्त्री जांभेकरांसारख्या विचारवंतांची समृद्ध परंपरा लाभली असली, तरी धार्मिकतेचे अवडंबर आणि मातृभाषेतील शिक्षणाची उपेक्षा यांमुळे कोकणही बौद्धिक क्षेत्रात मागे पडत असल्याची खंत वाटते.
शिबिराच्या उत्तरार्धात उपस्थितांनी विविध प्रश्न उपस्थित करून आपल्या भावना व्यक्त केल्या. मराठी भाषा आणि संस्कृतीविषयी जागरूकता निर्माण करणाऱ्या या शिबिराला मराठीप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साधना गोरे यांनी केले.






