एसआरएम कॉलेज मध्ये ‘भाज्या व फळे सजावट स्पर्धा’

रानफुले छायाचित्र प्रदर्शनाचेही आयोजन
क. म. शि. प्र. मंडळाचे संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ येथील महिला विकास कक्षाच्या वतीने दि.२३ जुलै रोजी ‘भाज्या व फळे सजावट स्पर्धा’ तसेच ‘रानफुले छायाचित्र प्रदर्शनाचे’ आयोजन करण्यात आले. या दोन्ही उपक्रमांना महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापकांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला.
वर्ष २०२६ हे संपूर्ण जगभरात ‘आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष’ म्हणून साजरे केले जात आहे. शेती, माती आणि संपूर्ण अन्न प्रणालीमध्ये महिलांचे अत्यंत मोलाचे, परंतु अनेकदा दुर्लक्षित राहिलेले योगदान अधोरेखित करणे व त्याची समाजात जाणीव निर्माण करणे, या मुख्य उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून कालेली-माणगाव येथील महिला शेतकरी सौ. रेश्मा रामचंद्र कवठणकर उपस्थित होत्या. त्यांनी स्वतः शेती क्षेत्रातील अनुभव मांडत उपक्रमास मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला.
या प्रसंगी महिला विकास कक्षाच्या समन्वयक डॉ. शरयू आसोलकर यांनी स्वागत केले. स्पर्धेचे परीक्षण प्राध्यापक संतोष वालावलकर आणि सौ. कवठणकर यांनी केले. विविध विभागांचे विभागप्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.प्रज्ञा सावंत यांनी केले. प्रा.सिद्धी परब यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रा.काजल मातोंडकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.






