कणकवली एस.टी. आगारचा विकास आराखड्यात आशियेकडे जोडणा-या रस्त्याचा समावेश करा

पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे आशिये सरपंच महेश गुरव यांची मागणी ; सकारात्मक चर्चा

कणकवली तालुक्यातील आशिये येथील प्रस्तावित परिवहन महामंडळ कणकवली बसस्थानक विकासकामाला गती देण्यात यावी. तसेच या बसस्थानक व आगार विकसित होत असताना कणकवली ते आशिये जोडणारा मार्ग नियोजित विकास आराखड्यात समाविष्ट करण्याची मागणी मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्याकडे आशिये सरपंच महेश गुरव यांनी केली आहे. यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवली आशिये जोडणारा रस्ता आराखड्यात सामाविष्ट केला जाईल, असे आश्वासन देत सकारात्मक चर्चा केली.
यावेळी कणकवलीचे माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे , कलमठ सरपंच संदीप मेस्त्री आदी उपस्थित होते.
कणकवली एस.टी. बसस्थानक व आगाराचा नियोजित विकास शासनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. सदरची जागा राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या कणकवली-आचरा मार्गाला लागून आहे. या नियोजित विकास आराखड्यामध्ये आशिये येथील एस.टी. आगार सर्व जागांचा समावेश करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर आशिये रोडला जोडण्यासाठी प्रस्तावित असलेला रस्ता संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन एस.टी. आगाराशी जोडण्यात यावी. हा रस्ता थेट आशिये रोडला जोडला गेल्यास कणकवली-आचरा मार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होईल. तसेच मालवण, आचरा आणि देवगडच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी हा मार्ग अधिक सोयीचा ठरणार असून, परिसराच्या विकासालाही चालना मिळणार आहे.त्यामुळे या प्रस्तावित रस्त्याचा नियोजित विकास आराखड्यात समावेश करून आवश्यक ती तरतूद करावी आणि आशिये एस.टी. आगाराला जोडणारा रस्ता विकसित करण्यासाठी संबंधित यंत्रणांना निर्देश द्यावेत, अशी मागणी आशिये ग्रामपंचायत सरपंच महेश गुरव यांनी केली आहे.

error: Content is protected !!