कणकवली येथे पूर्णानंद महिला मंचातर्फे स्त्रियांची मोफत आरोग्य तपासणी शिबिर

30 महिलांनी घेतला शिबिराचा लाभ
महिलांच्या वयाच्या पस्तीशी नंतर त्यांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घेणे आणि तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने आहारात योग्य तो बदल करून घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन डॉ. दीपाली चराटे यांनी महिला आरोग्य तपासणी शिबिराचे वेळी केले. हे शिबिर पूर्णानंद महिला मंचाचे ३५ वर्षे वरील वयाच्या समस्त महिला वर्गासाठी विनामूल्य आयोजित केले होते.
डॉ. चराटे यांच्यासोबत “ज्योतिर्मय योग” च्या योग तज्ञ आणि प्रशिक्षक सौ. स्नेहा दामोदर खानोलकर या सुद्धा सह-प्रायोजक म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी नोकरी- व्यवसाय करणाऱ्या आणि गृहिणी महिलांसाठी सोपे योग प्रकार प्रात्यक्षिक दाखविले आणि उपस्थित महिलांकडून करवून घेतले. मात्र प्रत्येक योगासन हे एकाच वेळी समस्त महिलांनी करण्यापेक्षा प्रत्येकीचे वय, वजन, शारीरिक स्थिती, व्याधी, उपलब्ध वेळ यानुसार योग्य अशी योगासने करण्याचा सल्ला त्यांनी दिला.
वयाची पस्तीशी उलटली की गर्भाशय सोनोग्राफी, रक्त तपासणी, डोपामाइन हार्मोन्स तपासणी, ब्रेस्ट तपासणी आणि त्याप्रमाणे दैनंदिन आहारात बदल करणे आवश्यक आहे असे डॉ. दीपाली म्हणाल्या.
शिबिराचा लाभ ३० महिलांनी घेतला. मान्यवरांचे स्वागत आणि आभार प्रदर्शन मंचाच्या अध्यक्षा सौ सुलभा सामंत यांनी केले तर सौ. स्नेहा दामोदर खानोलकर यांनी शिबिर यशस्वितेसाठी विशेष परिश्रम घेतले. सौ नेत्रा आजगावकर, सौ. सपना देसाई, सौ रूपा प्रभू यांनी सहकार्य केले.






