वैभववाडी आचिर्णे मध्ये शिकारीसाठी गेलेल्या एकाला बंदुकीचे छरे लागून मृत्यू

डोकी पासून हातापर्यंत शरीरावर छरे लागल्याच्या खुणा
जिल्ह्यात शिकारीच्या उद्देशाने फिरत असताना सलग दोन घटनेने खळबळ
वैभववाडी तालुक्यातील आचिर्णे येथे मध्यरात्री शिकारीच्या उद्देशाने गेलेल्या काही तरुणांना बंदुकीचे छरे लागून एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शिकारीसाठी गेले असताना सात एप्रिल रोजी रात्री दहा वाजल्या च्या सुमारास घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. बंदुकीच्या काडतूस मधील छरे मृत सागर सूरेश पोटळे (वय 26, रा. घाणेगडवाडी, आचिर्णे) या तरुणाच्या डोकी पासून हातापर्यंत लागले असल्याच्या खुणा दिसत आहेत. आचिर्णे परिसरात काही जण मध्यरात्री शिकारीसाठी गेले होते. त्यावेळी अचानक बंदुकीची गोळी सुटण्याचा आवाज आला व यामध्ये सदर तरुणाचा मृत्यू झाला. तर कृष्णा सुरेश कातकर (वय 25, रा. आचिर्णे घाणेगडवाडी) हा जखमी झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर हे आपल्या पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. गोळीबार नेमका कशामुळे झाला, अपघाती की अन्य काही कारण आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. मृत तरुणाला कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आणले असून जखमीला खाजगी रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आले आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वीच कणकवलीतील सुशांत दळवी या बांधकाम व्यवसायिकाचा देखील शिकारीच्या उद्देशाने फिरत असताना बंदुकीचा बार लागून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर जिल्ह्यात वैभववाडी मध्ये घडलेली ही दुसरी घटना असल्याने एकच खळबळ उडाली आहे.





