बुधवार 21 ऑक्टोबर रोजीफोंडाघाट येथे आनंदयात्रा: मुक्त प्रवेश

सुप्रसिद्ध कवी आणि मोटिवेशनल स्पीकर श्री प्रसाद कुलकर्णी यांचा आनंदयात्रा हा धमाल एकपात्री कार्यक्रम स्नेहसिंधू आश्रम, फोंडाघाट येथे बुधवार, २१ ऑक्टोबर २०२६ रोजी संध्याकाळी ४ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
संदीप परब यांचे सिंधुआश्रम फोंडाघाट आणि फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी यांच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम मोफत आहे
प्रसाद कुलकर्णी हे एक सिद्धहस्त कवी, चित्रपट गीतकार, प्रभावी वक्ता, मराठी शुभेच्छापत्रांचे जनक अशा अनेक नात्यांनी रसिकांना परिचित आहेत. पण त्यांना प्रामुख्याने ओळखलं जातं ते लोकांना आनंदाने जगण्याची प्रेरणा देणारा मोटीवेटर म्हणून.
‘आनंदयात्रा’ हा त्यांचा सकारात्मक दृष्टीने जीवन जगायला शिकवणारा धमाल कार्यक्रम खूप लोकप्रिय आहे. देशात आणि परदेशात मिळून आजवर या कार्यक्रमाचे आठशेहून अधिक प्रयोग झाले आहेत. वाकचातुर्य, हजरजबाबीपणा आणि त्यासोबत किस्से, कविता, शेरोशायरी अन धमाल विनोदांची रेलचेल! यामुळे त्यांच्या या कार्यक्रमाला नेहमीच भरगच्च प्रतिसाद मिळतो. विविध क्षेत्रातील नामवंत नेते, अभिनेते, उद्योगपती अशा विविध स्तरातील रसिकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावलेली आहे यामध्ये प्रामुख्याने ज्येष्ठ राजकीय नेते श्री शरद पवार, खासदार अरविंद सावंत, माजी कॅबिनेट मंत्री सुभाष देसाई, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, समाजसेवक विकास आमटे, ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर, सर्वश्री दिलीप वळसे पाटील, गौतम राजाध्यक्ष अशा मान्यवरांचा समावेश आहे
आज सर्वत्र नकारात्मकता भरून राहिलेली असताना, माणसं डिप्रेशनची शिकार होत असताना आनंदाने जगण्याचा अक्षय मंत्र देणारा हा धमाल कार्यक्रम रसिकांनी चुकवू नये असे आवाहन संविता आश्रमाचे संस्थापक संचालक श्री संदीप परब यांनी केले आहे.






