बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ आणि प्रेरणादायी विचारवंत डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमात इयत्ता सहावी ते नववीतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले.
या निमित्ताने विद्यार्थ्यांनी विविध पुस्तकांचे सुंदर वाचन केले. वाचनामुळे ज्ञानात भर पडते, विचारशक्ती विकसित होते, कल्पनाशक्तीला चालना मिळते आणि व्यक्तिमत्त्व विकासाला हातभार लागतो, याविषयी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
डॉ. अब्दुल कलाम यांना वाचनाची विशेष आवड होती. त्यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यामागील प्रमुख उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करणे आणि नियमित वाचनाची सवय विकसित करणे हा असल्याचे शिक्षकांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या वतीने मिहीर उमेश नेवाळकर, श्रेयस जितेंद्र परब (इयत्ता नववी), सिया लक्ष्मण देसाई, स्वरा योगेश कोळी, आराध्या प्रशांत मागाडे (इयत्ता सहावी) आणि अंजली राज अग्रवाल (इयत्ता आठवी) यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच शिक्षिका प्रीती म्हाडदळकर, अश्विनी परब आणि सीबीएसई विभागाच्या प्राचार्या चैताली बांदेकर यांनीही आपल्या मनोगतातून डॉ. कलाम यांच्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाचा, त्यांच्या वाचनाच्या छंदाचा आणि सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासातील वाचनाच्या महत्त्वाचा ऊहापोह केला.
या कार्यक्रमाला सीबीएसई विभागाच्या प्राचार्या चैताली बांदेकर, शिक्षिका अश्विनी परब, प्रीती म्हाडदळकर यांच्यासह अन्य शिक्षक उपस्थित होते. वाचनाची आवड जोपासण्याचा संदेश देणारा हा उपक्रम उत्साहात पार पडला.

error: Content is protected !!