जिल्ह्यातच रोजगारनिर्मितीसाठी एमआयडीसी विकसित करणार – आमदार निलेश राणे

वेताळबांबर्डे येथे ‘नाईक टायर्स अँड बॅटरी’ दालनाचे उद्घाटन

सिंधुदुर्ग जिल्हा हे पर्यटनाच्या दृष्टीने सोनं आहे. जिल्ह्यातील पर्यटनासह उद्योगांचा विकास करून स्थानिक तरुणांना इथेच रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी एमआयडीसी विकसित करण्यावर भर दिला जात आहे. प्रदूषणविरहित उद्योग आणून रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे प्रतिपादन कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांनी केले.
कुडाळ तालुक्यातील वेताळबाबर्डे येथे उभारण्यात आलेल्या ‘नाईक टायर्स अँड बॅटरी’ या भव्य दालनाचे उद्घाटन गुरुवारी सायंकाळी आमदार निलेश राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी युवा उद्योजक राहुल नाईक यांनी युरोप सोडून मायभूमीत व्यवसाय उभारल्याबद्दल त्यांचे कौतुक करत, व्यवसायासाठी धाडस आणि समाजाला रोजगार देण्याची तळमळ महत्त्वाची असल्याचे राणे यांनी सांगितले. जिल्ह्यात निर्यात आणि औद्योगिक क्लस्टर विकसित करण्याच्या दृष्टीनेही विचार होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, लायन्स क्लब ऑफ कुडाळचे पदाधिकारी, सीए सुनील सौदागर, अ‍ॅड. अजित भणगे, अ‍ॅड. श्रीनिवास नाईक, लायन्स क्लबच्या अध्यक्ष स्नेहा नाईक, अ‍ॅड. अजित पाठक, आनंद शिरवलकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहा नाईक यांनी केले. अ‍ॅड. श्रीनिवास नाईक आणि राहुल नाईक यांनी आभार मानले.

error: Content is protected !!